नागपूर : एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदली करत ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याअंतर्गत हा प्रकार घडला.
राजेंद्र रामचंद्र सिंह (८१, फ्रेंड्स कॉलनी) हे आपल्या पत्नीचे एटीएम कार्ड घेऊन फ्रेंड्स कॉलनी चौकातील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी एटीएममधील दुसऱ्या मशीनवर आणखी एक व्यक्ती उभा होता. सिंह यांनी मशीनमध्ये कार्ड टाकल्यावरदेखील पैसे येत नव्हते. त्यामुळे ते संभ्रमात पडले. त्यांनी आणखी दोनदा प्रयत्न केले. मात्र पैसे निघाले नाही.
दरम्यान, त्या व्यक्तीने ‘क्या हुआ अंकल’ असे विचारत संबंधित इसमाने सिंह यांचे एटीएम कार्ड घेतले व ते मशीनमध्ये टाकण्याचा अभिनय केला. त्याने हातचलाखीने एटीएम कार्ड बदलविले व तो निघून गेला. सिंह यांनी त्या इसमाने हाती दिलेले एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकल्यावर ‘इनव्हॅलिड’चा मॅसेज लिहून आला. त्यामुळे ते परत निघून गेले.
दुसऱ्या दिवशी ते परत पैसे काढण्यासाठी गेले असता परत ‘इनव्हॅलिड’चा मॅसेज स्क्रीनवर झळकला. त्यांनी कार्ड निरखून पाहिले असता त्यावर निहाल मालवी असे नाव होते. सिंह यांना शंका आली व त्यांनी पत्नीच्या मोबाईलमध्ये एसएमएस तपासले असता अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बॅंक खात्यातून चार वेळा ९ हजार ५०० व एकदा दोन हजार रुपये असे एकूण ४० हजार रुपये काढल्याची बाब लक्षात आली. त्यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली व पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.