नागपूर : विदर्भ इन्फोटेक प्रा.लि. या कंपनीच्या उपाध्यक्षांच्या नावाने बॅंकेत परस्पर खाते उघडून ७.८९ लाखांचा गैरकारभार केल्याची बाब समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपी कंपनीतीलच माजी चीफ अकाऊन्टंट असलेली महिला आहे. संबंधित महिलेने याअगोदरदेखील कंपनीत पावणेसहा लाखांचा घोटाळा केला होता. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
चैताली पंजाबराव ईंगलकर (४२, विठ्ठलनगर, उदयनगर) असे आरोपी महिलेचे नाव आहे. तर तक्रारदार प्रिती हेमंत लांजेकर (५१, खामला) या आहेत. त्या ‘व्हीआयपीएल’मध्ये उपाध्यक्षा आहेत. कंपनीच्या ऑडिटदरम्यान समृद्धी कोऑपरेटिव्ह बॅंकेत मे २०२२ मध्ये त्यांच्या नावाने परस्पर खाते उघडण्यात आल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी आणखी माहिती काढली असता जून २०२२ मध्ये कंपनीचे संचालक प्रशांत उगेमुगे याची सहीच्या माध्यमातून ७.८९ लाख रुपये संबंधित खात्यात जमा झाल्याची बाब समोर आली. त्या खात्यातून दुसऱ्याच महिन्यात पैसे काढण्यातदेखील आले. लांजेकर यांनी समृद्धी को ऑपरेटिव्ह बॅंकेला तक्रार करून सर्व तपशील मागविले.
कंपनीतील हेड अकाऊन्टंट चैताली ईंगलकर हिचे खाते त्या बॅंकेत असल्याचे दिसून आले. हस्ताक्षर तज्ज्ञाकडून संबंधित दस्तावेजांमधील अक्षरांची तपासणी केली असता ते चैतालीचे असल्याचे स्पष्ट झाले. तिने लांजेकर यांचे आधार कार्ड व पासपोर्ट फोटो घेऊन १९ मे २०२२ रोजी परस्पर बॅंकेत खाते उघडले होते. तिने खोटी स्वाक्षरीदेखील केली. त्यानंतर तिने बॅंकेकडून त्या खात्याचे चेकबुक घेऊन त्यामाध्यमातून पैसे काढून घेतले. लांजेकर यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी चैतालीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
टाईल्स घेण्यासाठी वापरली होती कंपनीची रक्कम
याच आरोपी चैतालीने कंपनीचे ५.७८ लाख रुपये स्वत:च्या घराची टाईल्स घेण्यासाठी वापरली होती. कंपनीला एनजीआरटी सिस्टम्स या कंपनीला ५.७८ लाख रुपये देणे होते. चैतालीने १ नोव्हेंबर २०२२ रोजी ही रक्कम आरटीजीएस करण्यासाठी धनादेशावर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांची स्वाक्षरी घेतली. मात्र तिने काही दिवस तो धनादेश स्वत:जवळच ठेवला व त्यानंतर नाशिक येथील मिहीर सिरॅमिक्स या कंपनीला ही रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून पाठविली. याची कंपनीत कुणालाच माहिती नव्हती. ऑडिटदरम्यान हा खुलासा झाला. जून २०२३ मध्ये णाप्रतापनगर पोलीस ठाण्यात चैतालीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता तिच्याविरोधात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे.