लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भागीदारांना १.३५ कोटींचा गंडा घालणाऱ्या पोर्ट ओ गोमेजचा मालक आलविन मार्टीन नोलबर्ड गोम्स (वय ४९, रा. मेघदूत विला, सोनेगाव) याला धंतोली पोलिसांनी अटक केली.शोमिट सिद्धीनाथ बागची (वय ३८, रा. नेल्को सोसायटी, खामला) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी आलविन मार्टीन याने चार वर्षांपूर्वी बागची तसेच अन्य दोन सहकाऱ्यांच्या मदतीने नागपुरात मोठे हॉटेल सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. त्यासाठी किती खर्च येईल आणि त्यातून कसा चांगला आर्थिक लाभ मिळेल, याबाबतचाही हिशेब सांगितला. त्याच्यावर विश्वास ठेवून बागची आणि अन्य दोघांनी १ जानेवारी २०१५ ला भागीदारीत हॉटेल सुरू करण्यासंबंधीचा करारनामा केला. तिघांनी आलविनकडे रक्कम दिली. हा सर्व व्यवहार पंकज राठी यांच्या धंतोलीतील कार्यालयात पार पडला. तेव्हापासूनच्या व्यवहाराच्या नोंदी तसेच ३१ डिसेंबर २०१८ पर्यंतची कागदपत्रे आलविनने गहाळ केली आणि १ कोटी, ३५ लाख, ७० हजार, ८०२ रुपयांच्या हिशेबाचा गोलमाल केला. या संबंधाने बागची व अन्य दोन भागीदारांनी आलविनला विचारणा केली असता त्याने समाधानकारक माहिती दिली नाही. त्यामुळे बागची आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी आलविनविरुद्ध धंतोली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर या प्रकरणात सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज सकाळी आरोपी आलविनला अटक करण्यात आली.दुसऱ्यांदा आरोप, दुसरा गुन्हाशंकरनगर चौकाजवळ आलविनचे पोर्ट ओ गोमेज नावाने भले मोठे हॉटेल आहे. जहाजाच्या आकाराचे हे हॉटेल उपराजधानीतील वैशिष्ट्यपूर्ण हॉटेल म्हणून नावारुपाला आले असताना दोन वर्षांपूर्वी या हॉटेलच्या एका महिला कर्मचा-याने गोम्सवर शोषणाचा आरोप लावला होता. लग्नाचे आमिष दाखवून पत्नीसारखा वापर केल्यानंतर गोम्स आता वाऱ्यावर सोडू पाहात असल्याचे तिचे तक्रारीत नमूद केले होते. हे प्रकरण त्यावेळी चांगलेच गाजले होते.