नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चार वर्षांपूर्वी बुकिंग केलेल्या तीन कोटींच्या पेन्ट हाऊसची परस्पर दुसऱ्यांना विक्री करून स्थानिक व्यावसायिक आणि त्यांच्या इटलीतील भावाची फसवणूक करणाऱ्या बिल्डर वैभव जयपुरिया आणि त्यांचा व्यवस्थापक संजीव कौल या दोघांविरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
नागपूर, विदर्भातील सर्वात मोठे बिल्डर अशी ओळख असलेले जयपुरिया यांची हॉटेल रेडिसन ब्ल्यूच्या बाजूला इंद्रिको हाईट्स नावाने १२ माळ्यांची आलिशान स्कीम आहे. फिर्यादी सूर्यकांत साहेबराव सिरसाट हे सोमलवाड्यात राहतात. ते राशींच्या खड्यांचा व्यवसाय करतात. तर त्यांचे लहान बंधू महेंद्र साहेबराव सिरसाट इटलीत वास्तव्याला आहेत. ते योगगुरू म्हणून ओळखले जातात. सिरसाट बंधूंनी २०१६ मध्ये वैभव जयपुरिया तसेच त्यांचे व्यवस्थापक संजीव कौल यांच्याशी प्रत्यक्ष बोलणी करून पेन्ट हाऊसची बुकिंग केली. पाच हजार चौरस फुटाच्या या पेन्ट हाऊसची किंमत ६ हजार रुपये चौरस फूट याप्रमाणे तीन कोटी रुपये ठरली. सिरसाट यांनी त्यावेळी २० लाखाचा धनादेश आणि २९ हजार युरो (२५ लाखाचे युरोपियन चलन) दिले. त्यानंतर प्रत्येक तीन महिन्यानंतर दहा लाख रुपये देण्याचे ठरले. जयपुरिया यांना ४५ लाख रुपये दिल्यानंतर पेेन्ट हाऊसचा लेखी करारनामा करण्यात आला. १ नोव्हेंबर २०१७ ला पुन्हा ५० लाखांचा धनादेश वैभव जयपुरिया यांच्या कार्यालयात जमा करण्यात आला. अशाप्रकारे ९५ लाख रुपये घेतल्यानंतर जयपुरिया आणि त्यांच्या व्यवस्थापकांकडून सिरसाट यांना पेन्ट हाऊस ऐवजी ९०१ क्रमांकाचा फ्लॅट देण्याबाबतची भाषा वापरली जाऊ लागली. सिरसाट यांनी केलेल्या चौकशीत करार केलेले पेन्ट हाऊस जयपुरिया यांनी दुसऱ्यांना विकल्याचे लक्षात आले. सिरसाट यांनी जास्त वाद वाढू नये म्हणून ती सदनिका घेण्याचे मान्य केले. मात्र या सदनिकेचे ठरलेल्या दराप्रमाणे दर न लावता आणखी जास्त पैसे लागतील, असे ते म्हणाले. सिरसाट यांनी जास्तीचा दर देण्यास नकार दिला असता ‘तुमसे जो बनता कर लो, तुम मेरा कुछ नहीं बिगाड सकते’, असे म्हणून जयपुरी आणि कौल यांनी सिरसाट यांना टाळणे सुरू केले. जयपुरिया आणि त्यांच्या व्यवस्थापकांनी विश्वासघात करून फसवणूक केल्यामुळे शिरसाट यांनी प्रतापनगर ठाण्यात धाव घेतली. तिथून न्याय मिळणार नाही, हे लक्षात आल्यामुळे त्यांनी थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे धाव घेतली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत सखोल चौकशी केली. उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे बिल्डर जयपुरिया आणि त्यांचे व्यवस्थापक संजीव कौल या दोघांनी सिरसाट यांची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे शनिवारी या प्रकरणात कलम ४०६, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
---
बांधकाम क्षेत्रात भूकंप
नागपूर, विदर्भातील सर्वात मोठे आणि वजनदार बिल्डर म्हणून ओळख असलेल्या जयपुरिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची चर्चा बांधकाम व्यावसायिकांत पसरल्याने भूकंप आल्यासारखे झाले आहे.
---