लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी रोख रक्कम देऊनही त्यांच्या नावे खासगी कंपनीचे कर्ज काढून पावणेदोन लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी ताजश्री होंडाच्या व्यवस्थापकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तीन वर्षांपूर्वीची ही बनवाबनवी आता उघड झाली, हे विशेष!संदीप गोहारीकर असे आरोपीचे नाव असून तो हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ताजश्री होंडा शोरूममध्ये व्यवस्थापक आहे. अमृता अशोक कर्डक (वय २१, रा. मानेवाडा) या तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, अमृताने ७ सप्टेंबर २०१९ ला दुचाकी विकत घेतली होती. रोख रक्कम देऊनही आरोपी गोहारीकर याने अमृताच्या नावे निर्मल उज्ज्वल बँक कामठी येथे खाते उघडले. त्या कागदपत्रांवर अमृताच्या बनावट सही करून दुचाकीवर कर्ज काढून ती रक्कम हडपली. त्याचप्रमाणे वैशाली संजय बारापात्रे आणि कल्पना सतीश यादव यांनी सुद्धा रोख रक्कम देऊन तेथून दुचाकी विकत घेतली होती. मात्र आरोपी गोहारीकर याने बारापात्रे आणि यादव यांच्या दुचाकीवर खासगी कंपनीचे कर्ज प्रकरण तयार केले आणि तिघींच्या नावे एकूण १ लाख ७३ हजार ९३६ रुपये उचलले. दरम्यान, कर्जाचे हप्ते थकल्यामुळे त्यांना वारंवार पत्रे येऊ लागली. त्यानंतर या प्रकरणाचा भंडाफोड झाला. अमृता हिने दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर शुक्रवारी या प्रकरणात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
ताजश्री होंडाच्या व्यवस्थापकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 12:23 AM