लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन फ्लॅटची विक्री करून मित्राकडून २६ लाख रुपये घेतल्यानंतर तेच फ्लॅट बँकेकडे गहाण ठेवून आरोपीने त्यावर ९६ लाखाचे कर्ज उचलले. मित्राशी दगाबाजी करणाऱ्या आरोपीचे नाव वैभव वसंतराव बोडके असे असून, तो न्यू मनीष नगरच्या वैभव अपार्टमेंटमध्ये राहतो. अजय बाबुराव शेंद्रे (रा. कान्द्री कन्हान) यांनी प्रतापनगर पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, आरोपी बोडके आणि त्यांची मैत्री होती. या मैत्रीतून १२ जून २०१६ ला आरोपी बोडकेने मौजा परसोडीतील फ्लॅट नंबर ३०१ आणि ३०२ शेंद्रे यांना विकण्याचा सौदा केला. त्यापोटी वेळोवेळी २६ लाख रुपये शेंद्रे यांच्याकडून घेतले. त्यानंतर बोडकेने या फ्लॅटची रीतसर विक्रीपत्र आणि कब्जा न देता हे दोन्ही फ्लॅट बँकेत गहाण ठेवून त्यावर ९५ लाख, ९० हजारांचे कर्ज घेतले. ही माहिती कळाल्यानंतर शेंद्रे यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
मित्राने केली फसवणूक : २६ लाख रुपये हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 12:46 AM
दोन फ्लॅटची विक्री करून मित्राकडून २६ लाख रुपये घेतल्यानंतर तेच फ्लॅट बँकेकडे गहाण ठेवून आरोपीने त्यावर ९६ लाखाचे कर्ज उचलले.
ठळक मुद्दे फ्लॅट बँकेत गहाण ठेवले