लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - सिक्युरिटी एजन्सीच्या एका भागीदाराने दगाबाजी करून ५० लाखांची अफरातफर केली. या प्रकरणात रघुवीर साधूसिंग (वय ६८)या नोएडा येथील व्यावसायिकाच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
सिंग यांच्या तक्रारीनुसार, जरीपटक्यातील लता अपार्टमेंटमध्ये राहणारे आरोपी मलकितसिंग करमसिंग (वय ६२) यांच्यासोबत त्यांनी भागीदारीत सिक्युिरटी एजन्सी सुरू केली होती. ऑगस्ट २०१७ ते ऑक्टोबर २०१८ या कालावधीत मलकितसिंगांनी पीपीएफ, एसीएस तसेच जीएसटीचे ४९, ३६, ८७५ रुपये सरकारी कोषागारात जमा केले नाही. आपल्या भागीदाराला अंधारात ठेवून मलकितिसंग यांनी ही रक्कम स्वत: वापरली. या अफरातफरीची कुणकुण लागल्यानंतर मलकितसिंग यांना भागीदार रघुवीरसिंग यांनी विचारणा केली असता त्यांनी असंबंद्ध उत्तरे दिली. मलकितसिंगने दगाबाजी केल्याचे लक्षात आल्याने रघुवीरसिंग यांनी जरीपटका पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
----