साडेचार लाख हडपले - ऑईल खरेदीच्या नावाने लावला चुना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑईल खरेदीच्या व्यवहारात मध्यस्थी करण्याची विनंती करून कंपनी सेक्रेटरी असलेल्या एका महिलेची सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केली.
युगंधरा प्रकाश कोठाळकर (वय ३७) असे फसगत झालेल्या महिलेचे नाव आहे. रेशिमबागमध्ये त्यांचे निवास आणि कार्यालय आहे. ३१ डिसेंबरला दुपारी ३ च्या सुमारास त्यांना एक फोन आला. आमची डेन्मार्कला कंपनी असून आम्हाला एक्सलोपिया ऐथियोपिया लिक्विड ऑईलची खरेदी करायची आहे. एक लाख रुपयाला १ हजार मिलीलीटर किमतीच्या या तेल खरेदी-विक्रीत तुम्ही मध्यस्थी करून आमच्याकडे माल पाठवा, तुम्हाला लाखोंचा फायदा होईल, असे जुनेना बोलेख नामक आरोपीने कोठाळकर यांना सांगितले. कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करणाऱ्या कोठाळकर यांनी कंपनीचे डिटेल्स आरोपींना विचारले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोठाळकर यांनी गुगलवर ते तपासले असता खरे असल्याचे भासले. भारतातील अर्चना एन्टरप्रायजेसच्या माध्यमातून हे तेल घ्यायचे असल्याचे सांगण्यात आले. फायद्याचा व्यवहार वाटल्याने कोठाळकर यांनी प्रारंभी एक लाख रुपयांचा ऑनलाइन व्यवहार केला. त्यानंतर डेन्मार्कमधील कथित कॉर्बनिअन लोबमॅन कंपनीचा प्रमुख जिरियन याने संपर्क करून आम्हाला १० लीटर तेल हवे असे सांगून तुम्ही बॉटलचे व्हॉटस्ॲप, मेलवर फोटो पाठवा, नंतर आम्ही तुम्हाला ऑर्डर देऊ अशी थाप मारली. त्यानुसार, कोठाळकर यांनी पुन्हा ३ लाख, ५८ हजार, ७०० रुपये (एकूण ४,५८,७००) ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून आरोपींकडे जमा केले. त्यानंतर त्यांना प्रत्येकी १ हजार मिलीलीटरच्या दोन तेलाच्या बाटल्या आल्या. त्या बाटल्या आणि त्यातील तेल पाहून कोठाळकर यांना शंका आली. त्यांनी त्याचे फोटो आरोपींना मेल आणि व्हॉटस्ॲपवर पाठविले. आरोपींनी त्यांना पुन्हा थाप मारून रक्कम जमा करण्यास सांगितले. आपली फसवणूक होत असल्याचे कोठाळकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर शाखेत धाव घेतली. ३१ डिसेंबर २०२० ते १५ जानेवारी २०२१ या कालावधीत आरोपी जुनेना बोलेख, जिरियन आणि अर्चना एन्टरप्रायजेसच्या दीक्षा कुमार नामक आरोपींसोबत झालेले मेल, व्हॉटस्ॲप मेसेज आणि संभाषण पोलिसांकडे सादर केले. ज्या खात्यात रक्कम जमा केली ते खाते तपासले असता त्यात जिरो बॅलन्स असल्याचे स्पष्ट झाले. कोठाळकर यांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्यामुळे सायबर शाखेने हे प्रकरण सक्करदरा ठाण्यात पाठविले. ठाणेदार सत्यवान माने यांनी तक्रार नोंदवून घेत सोमवारी याप्रकरणात भादंविच्या कलम ४२०, ३४ तसेच आयटी अॅक्ट६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.