योगेश पांडे
नागपूर : वीज बिल अपडेट करण्याचे मॅसेज पाठवून नागरिकांना लुबाडण्याचे प्रमाण मागील काही दिवसांपासून प्रचंड वाढले आहे. याबाबत जनजागृतीदेखील होत असताना आता लोकांना फसविण्यासाठी ‘सायबर’ गुन्हेगारांनी नवा ‘फंडा’ आणला आहे. नागरिकांच्या व्हॉट्सअपवर चक्क बनावट ‘लेटरहेड’वर नोटीस पाठवून भीती निर्माण करायची व त्यानंतर ‘लिंक’ वगैरे पाठवून समोरच्याचे बॅंक खाते रिकामे करायचे असा प्रकार सुरू झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नागपुरात जी-२० समिट होणार असल्याने या लेटरहेडवर त्याचा ‘लोगो’देखील वापरण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून विविध ग्राहकांना बनावट एसएमएस पाठवून लुबाडण्याचे प्रकार होत आहेत. यात वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट ‘एसएमएस’ पाठवून वीज बिल अपडेट करायला सांगितले जाते. त्यानंतर ग्राहकांनी संबंधित क्रमांकावर संपर्क केल्यावर महावितरणचा अधिकारी असल्याचे दाखवून बोगस लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करायला सांगून बॅंक खात्यातून रक्कम दुसरीकडे वळती करण्यात येते. मागील महिन्याभरातच यासंदर्भात अनेक गुन्हे नोंदविल्या गेले. मात्र अनेकांनी असे मॅसेज आल्यावर सावध पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळेच सायबर गुन्हेगारांनी आता व्हॉट्सअप क्रमांकावर बनावट ‘लेटरहेड’वर नोटीस पाठविण्याची नवीन ‘मोडस ऑपरेंडी’ सुरू केली आहे. ‘लोकमत’च्या हाती लागलेल्या एका अशा नोटीसमध्ये वीज मंत्रालयाच्या नावाने लेटरहेड आहे. त्यात एका बाजूला ‘आझादी का अमृतमहोत्सव’ आणि दुसरीकडे ‘जी-२०’च्या ‘लोगो’चा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला एखाद्या अधिकृत ‘लेटरहेड’चे ‘लूक’ आले आहे. या नोटीसमधील मजकूर हा अगोदरच्या मॅसेजेससारखाच आहे. मात्र हा पूर्णत: बनावटपणा आहे. तरीदेखील लोक याला बळी पडत असल्याचे चित्र आहे.
‘लेटरहेड’मुळे घाबरून बोगस ‘हेल्पलाईन’वर संपर्क
या ‘लेटरहेड’वर खाली ‘चीफ इलेक्ट्रिसिटी ऑफिसर’ची सही व शिक्का आहे. तसेच सरकारी यंत्रणेप्रमाणे ‘स्वच्छ भारत’चादेखील ‘लोगो’ वापरण्यात आला आहे. त्यामुळे लोक नोटिशीला सत्य मानत असून घाबरून ते नोटिशीत दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करतात. त्यानंतर फसवणुकीची मालिका सुरू होऊन जाते. आश्चर्याची बाब म्हणजे नोटीशीमध्ये बनावट ‘ट्वीटर हॅंडल’चादेखील उल्लेख करण्यात आला आहे.
एक क्लिक अन हॅकर होतात हिट
महावितरणकडून कोणालाही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून असे ‘एसएमएस’ व व्हॉट्सअॅप मेसेज पाठविले जात नाहीत. ग्राहकांनी त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक करून बॅंक खात्यातील शिल्लक रक्कम लंपास करण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी या बनावट मॅसेज व लिंककडे संपूर्णपणे दुर्लक्ष करावे, असेही आवाहन सायबर तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.