आनंद डेकाटे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे राज्य शासनाने संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनात ४०० रुपयाची वाढ करीत ती हजार रुपयापर्यंत पोहोचवून निराधारांना दिलासा दिला आहे. परंतु सध्याचे ६०० रुपये मानधन आहे तेच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मार्च ते मे या तीन महिन्याचे मानधन यंदा एकाच वेळी शासनाने जारी केले. प्रशासन म्हणते मानधन बँकेकडे वळते केले. बँक म्हणते जमाच झाले नाही. मार्च व मे महिन्याचे मानधन अद्याप लाभार्थ्यांना मिळालेले नाही. लाभार्थी बँकेच्या चकरा मारत आहेत. मग हा निराधारांचा निधी गेला कुठे, असा प्रश्न निर्माण झाला असून निराधारांच्या निधीचा पुरता गोलमाल सुरू आहे.राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, घटस्फोटित महिलांना अर्थसाहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना १९८० पासून राबविण्यात येत आहे. या योजनेच्या पात्रतेचे काही निकष आहेत. उदाहरणार्थ ती व्यक्ती किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावी, ६५ वर्षांपेक्षा कमी वय नसावे आदी अशा लाभार्थ्यास दरमहा ६०० रुपये देण्यात येतात. यासोबतच श्रावण बाळ योजनाही राबवली जाते. नागपूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे ९१ हजार ८०१ लाभार्थी आहेत. तर श्रावणबाळ योजनेचे १ लाख ३७ हजार ४४६ लाभार्थी आहेत. यामध्ये ९८,४७७ ग्रामीण भागात तर ३८,९६९ शहर भागात आहेत.या लाभार्थ्यांना फेब्रुवारी २०१९ पर्यंतचे अनुदान मिळाले होते. मार्चपासूनचे अनुदान मिळाले नाही. दर महिन्याला लाभार्थी बँकेत जायचे पण अनुदान आलेच नसल्याचे त्यांना सांगितले जात होते. जून महिना सुरू झाल्यानंतरही लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. शासनाकडूनच ते यायचे होते. जून मध्ये मार्च, एप्रिल आणि मे अशा तिन्ही महिन्याचे अनुदान शासनाने एकाचवेळी मंजूर केले. हे अनुदान जवळपास २१ कोटी रुपये इतके होते. परंतु लाभार्थ्यांना केवळ एकाच महिन्याचे अनुदान मिळाले. तेही एप्रिल महिन्याचे मार्च आणि मे चे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेच नाही. मग हा निधी गेला कुठे?
युनीयन बँक म्हणते, तपासून पाहावे लागेललाभार्थी असलेल्या एका बँकेत खरच निधी आला का, याबाबत काटोल रोड येथील युनियन बँक आॅफ इंडियात जाऊन तेथील शाखा व्यवस्थापकांशी चर्चा केली तेव्हा त्यांनाही याबाबत स्पष्टपणे काही सांगता आले नाही. जो निधी आला तो जमा झाला. उर्वरित का जमा झाला नाही हे तपासून पहावे लागेल. असे त्यांचे म्हणणे होते.असा पोहोचतो लाभार्थ्यांपर्यंत निधीशासनाकडून मंजूर निधी हा थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत नाही. तो अगोदर अॅक्सिस बँकेला पाठवला जातो. बॅकेकडून तो लाभार्थ्यांचे खाते असलेल्या बँकेत जमा होतो. बँकेत जमा झाला की तो लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जातो. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागामार्फत लाभार्थ्यांची यादी अॅक्सिस बँकेला पाठवली जाते.
तीन महिन्याचे मानधन एकाच वेळी पाठवलेमार्च महिन्यात काही अडचणी आल्याने निधी यायला वेळ लागला. परंतु मार्च आणि मे अशा तीन महिन्याचा एकत्रित निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. तो आमची मध्यवर्ती बँकिंग व्यवस्था असलेल्या अॅक्सिस बँकेला पाठवला आहे. त्याचे कामही पूर्ण झाले असून लाभार्थ्यांच्या खात्यात तो निधी जमाही झालेला असेल.उत्तम तोडसाम , तहसीलदार,संजय गांधी निराधार योजना, नागपूर
आमच्याकडे एकही केस पेंडिंग नाहीसंजय गांधी निराधार योजनेंतर्गत यंदा तीन महिन्याचा निधी एकाच वेळी आला होता. लाभार्थ्यांची यादी टप्याटप्प्याने सादर झाली. त्यानुसार टप्याटप्प्याने प्रत्येक लाभार्थी ग्राहक असलेल्या बँकेला निधी पाठवला आहे. तो लाभार्थ्यांच्या खात्यात जमाही झालेला असेल. सध्या आमच्याकडे एकही लाभार्थ्याची केस पेंडिंग नाही.संजय बर्मन , शाखा व्यवस्थापक, अॅक्सिस बँक, सिव्हील लाईन्स नागपूर