नागपूर : घोड्यांच्या शर्यतीवर पैसे लावून जास्त परतावा मिळवून देऊ अशा भूलथापा देऊन झारखंडमधील दोघांनी एका ट्रेडरची २ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात गणेशपेठ पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
वडधामना येथील ताडाने ले आऊट येथील रहिवासी रुकेश वाईकर याने मित्र मनोज चौरेवारच्या सांगण्यावरून मागील वर्षी मार्च महिन्यात गणेशपेठ येथील एका हॉटेलमध्ये झारखंडमधील दोन व्यक्तींची भेट घेतली. गौतमकुमार ईश्वर वर्मा (३२, रांची) व मो. इम्तियाज उर्फ मो. मन्सूर आलम (रांची) या दोघांनी रुकेशला आम्ही विनींगस्पिरीट या पुण्यातील कंपनीचे संचालक असून घोड्याच्या शर्यतीवर पैसे लावतो, अशी थाप दिली. जर गुंतवणूक केली तर दरमहा १६ टक्के नफा मिळेल तसेच इतर गुंतवणूकदार आणले तर इन्सेन्टिव्हदेखील मिळेल, असा दावा त्यांनी केला. कोरोनात काम नसल्याने रुकेश यांनी पैसे गुंतवायची तयारी दाखविली. १ मार्च २०२१ ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत रुकेशने त्यांच्या खात्यात २ लाख १० हजार रुपये जमा केले. रुकेशचा विश्वास बसावा म्हणून आरोपींनी पहिल्या महिन्यात १६ हजार ६६६ रुपयांचा परतावादेखील दिला. मात्र, त्यानंतर परतावा मिळणे बंद झाले. दोन्ही आरोपींनी फोनवर पैसे परत देण्यासदेखील टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. अखेर रुकेशला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले व त्याने पोलिसांकडे धाव घेतली.
आणखी लोकांचीदेखील फसवणूक ?
ज्या प्रकारे झारखंडमधून येऊन दोन्ही आरोपींनी रुकेशची फसवणूक केली, त्याचप्रमाणे शहरातील इतरही लोकांना त्यांनी ‘टार्गेट’ बनविले असण्याची शक्यता आहे. पोलीस त्या दिशेनेदेखील तपास करत आहेत.