नागपूर : ‘एथनिक विअर’ बनविण्यासाठी दिलेले १२.७५ लाखांचे कापड व साहित्याची एका कारागिराने परस्पर दुसऱ्याच व्यक्तीला विक्री केली. संबंधित व्यापाऱ्याची फसवणूक केल्यानंतर कारागिर फरार झाला आहे. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही फसवणुकीची घटना घडली.
मोहीत मनोज वैद्य (२६) यांचे मोहीत गारमेंट नावाचे दुकान असून त्यांचा ‘एथनिक विअर’चा व्यवसाय आहे. ते होलसेलमध्ये ‘एथनिक विअर’ तयार करण्यासाठी लागणारे कापड, अस्तर, कॉलर, बटन व इतर साहित्य खरेदी करून शिलाई काम करणाऱ्या कारागिरांना देतात व कारागिर प्रत्यक्षात ‘एथनिक विअर’ तयार करतात. अब्दुल बसर उर्फ गुड्डी दिल मोहम्मद मंसुरी (३७, आरके ले आऊट, भिलगाव रोड) हा दोन वर्षांपासून मोहीत यांच्याकडे कारागिर म्हणून कामाला होता.
मोहीत यांनी त्याला २८ मे २०२२ ते ३ एप्रिल २०२३ या कालावधीत १२.७५ लाखांचा कच्चा माल दिला. त्याची नोंददेखील डिलिव्हरी मेमो बुकमध्ये होती. मात्र अब्दुलने त्यांना वेळेत ‘एथनिक विअर’ तयार करून दिले नाही. मोहीत यांनी वारंवार विचारणा केली असता त्याने टाळाटाळ केली. अखेर मोहीत यांनी त्याला कापड व साहित्य परत मागितले. त्यावेळी त्याने कापडाची परस्पर भलत्याच व्यक्तीला विक्री केल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच मोहीत यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.