लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केवळ दोन लाख रुपयात अर्धा किलो सोने देण्याचे आमिष दाखवून दोघांनी एकाला दोन लाख रुपयांचा गंडा घातला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेचा शनिवारी भंडाफोड झाल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. श्याम रमेश सोळंकी (वय २६) आणि लालू शंकर सोळंकी (वय २८) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही पिपळा फाटा भागातील देवीकांत नगरात राहतात.सोळंकी आणि त्यांचे साथीदार अनेक वर्षांपासून नकली सोने विकण्याच्या गोरखधंद्यात सहभागी आहेत. श्याम आणि लालूने यावेळी हिंगणा एमआयडीसी मार्गावरील राजीव नगरात राहणारा जितेंद्र दहारी पंडित (वय २६) या तरुणाला आपल्या जाळ्यात ओढले. आमच्याकडे खोदकामात मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याची बतावणी आरोपींनी केली. १५ ते १७ लाख रुपये किमतीचे अर्धा किलो सोने केवळ दोन लाखांत देण्याचे आमिष आरोपी सोळंकीने पंडितला दाखविले. त्याचा विश्वास बसावा म्हणून आरोपींनी दाखविलेल्या सोन्याच्या हारातील एक छोटासा तुकडा पंडितला असली की नकली ते तपासण्यासाठी दिला. तो सोन्याचा तुकडा अस्सल सोने असल्याचे स्पष्ट होताच पंडितने आरोपींना शनिवारी दोन लाख रुपये दिले. ठरल्याप्रमाणे आरोपींनी त्याला अर्धा किलो वजन असलेला पिवळ्या धातूचा हार दिला. पंडितने काही वेळेनंतर हा हार सराफाकडे दाखविला असता तो सोन्याचा नव्हे तर पितळेचा असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी फसवणूक केल्याचे उघड होताच पंडित यांनी एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी लगेच धावपळ करून श्याम आणि लालू सोळंकीला ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.
अनेकांची फसवणूकआरोपी सोळंकी आणि त्यांच्या साथीदारांचा हाच गोरखधंदा असल्याचे सांगितले जाते. पिपळा भागात या भामट्यांचे वास्तव्य आहे. महिनाभरापूर्वी त्यांनी अशाच प्रकारे लकडगंजच्या बाजारात एका तरुणाला गंडविण्याचा प्रयत्न केला होता. तर, दोन महिन्यांपूर्वी नकली सोन्याच्या गोरखधंद्यात सहभागी असलेल्या एका तरुणाची काही दिवसांपूर्वी परिमंडळ चार मध्ये राहणाऱ्या आरोपींनी निर्घृण हत्या केली होती.