लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिक्कीम मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला अॅडमिशन करून देण्याची थाप मारून एका टोळीने नागपुरातील जलारामनगरात राहणारे जिमी प्रफुल्ल रांदेरिया (वय ४३) यांना ९ लाख १५ हजारांचा गंडा घातला.मुलाला डॉक्टर बनविण्याचे जिमी यांचे स्वप्न आहे. त्यासाठी ते अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत आहेत. ०८३७१८७९४५३, ७४०७३५६९३८ क्रमांकाच्या मोबाईलधारकांनी त्यांना काही दिवसांपूर्वी संपर्क केला. एमबीबीएसच्या प्रवेशासाठी लागणारी पात्रता आणि अन्य बाबींवर चर्चा केल्यानंतर जिमी यांच्याशी आरोपींनी सलगी साधली. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी जिमी यांच्या मुलाची सिक्कीम मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला अॅडमिशन करून देतो, असे आमिष दाखविले. त्यानंतर ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत आरोपींनी जिमी यांना बँकेच्या गंगटोक शाखेतील ०१५४८०२०००००१२ या खात्यात रक्कम जमा करायला भाग पाडले. त्यानुसार जिमी यांनी एचडीएफसी बँकेतून कोटक महिंद्रा तसेच येस बँकेत ९ लाख १५ हजार रुपये जमा केले. रक्कम जमा केल्यानंतर आरोपींनी सांगितल्याप्रमाणे वर्तन केले नाही. त्यामुळे जिमी यांना संशय आला. त्यांनी संबंधित महाविद्यालयाच्या प्रशासनाकडे संपर्क साधला असता, त्यांना त्या ठगबाजांनी फसविल्याचे लक्षात आले. त्यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
नागपुरात एमबीबीएसच्या अॅडमिशनची थाप; ९ लाख १५ हजारांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 11:20 AM
सिक्कीम मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला अॅडमिशन करून देण्याची थाप मारून एका टोळीने नागपुरातील जिमी प्रफुल्ल रांदेरिया (वय ४३) यांना ९ लाख १५ हजारांचा गंडा घातला.
ठळक मुद्देसायबर गुन्हेगारांनी ९.१५ लाख हडपले