लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - विदेशात उच्च शिक्षणाची आणि इतर व्यवस्था करून देण्याची थाप मारून दिल्लीतील दोघांनी स्थानिक दाम्पत्याचे पाच लाख रुपये हडपले. बुधवारी या प्रकरणात प्रतापनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
आदित्य मनोहर कलकोटवार (वय ३५) असे फिर्यादीचे नाव आहे. ते शिवशक्ती ले-आऊट प्रतापनगरमध्ये राहतात. आदित्य आणि त्यांच्या पत्नीचे बीसीसीएचे शिक्षण झाले असून त्यांना सिंगापूरमध्ये उच्च शिक्षणासाठी जायचे होते. गेल्या वर्षी त्यांनी फेसबुकवर एज्युकेशन ओव्हरसिज कन्सल्टंट (अग्रवाल मिलेनिअम टॉवर, नेताजी सुभाष पॅलेस वजिरपूरा, दिल्ली)ची जाहिरात बघितली. त्यात नमूद क्रमांकावर आदित्य यांनी संपर्क साधला. आरोपी हरप्रित सिंग याने सिंगापूरच्या ऑस्ट्रेलियन सिंगापूर कॉलेजमध्ये व्यवस्था करून देण्याची थाप मारली. त्यासाठी अप्लिकेशन फी, डिफेन्स चार्ज आणि व्हिजा आदीसाठी ११ लाख रुपये भरावे लागेल, असे सांगितले. आदित्य यांनी त्यांचे आणि पत्नीच्या नावाने आरोपी हरप्रित सिंगने सांगितलेल्या माहितीची शहानिशा भरतकुमार (डायरेक्टर) याच्याकडून करून घेतली. त्यानंतर १ डिसेंबर २०२० ला उपरोक्त दोन्ही आरोपींनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या बँक खात्यात ११ लाख रुपये जमा केले.
---
कोरोनाच्या नावाने टाळाटाळ
रक्कम विड्रॉल केल्यानंतर आरोपींनी कोरोना, लॉकडाऊन आणि असेच कारण सांगून टाळाटाळ चालवली. सात महिने होऊनही त्यांनी उच्च शिक्षणाची सोय करून दिली नाही. त्यामुळे आदित्य यांनी आरोपींना आपली रक्कम परत मागितली. बरीच टाळाटाळ केल्यानंतर आरोपींनी आदित्य यांना पाच लाख रुपये परत केले. ६ लाख, ९, ५२४ रुपये मात्र परत केले नाही.
---
अखेर पोलिसांकडे धाव
आरोपी रक्कम परत करणार नाही, हे लक्षात आल्यामुळे तसेच त्यांनी फसवणूक केल्याची खात्री पटल्याने आदित्य यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार दिनकर ठोसरे यांनी उपलब्ध पुराव्याच्या आधारे आरोपी हरप्रित सिंग आणि भरतकुमार या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
----