लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - एमबीबीएसला ॲडमिशन करून देण्याची थाप मारून दोन भामट्यांनी झारखंडमधी एका व्यक्तीचे दीड लाख रुपये हडपले. सोमवारी हा प्रकार उजेडात आला. बालेश्वर रुपनाथ महंतो (वय ५१) हे झारखंडमधी चत्रा जिल्ह्यात बछरा येथे राहतात. मुलीला एमबीबीएसला ॲडमिशन मिळावी यासाठी महंतो प्रयत्नशील होते. कानपूरच्या एमआयजी सेक्टर ४ मध्ये राहणारा आरोपी पंकज दुबे याने ९ जुलै २०१९ ला महंतो यांच्याशी संपर्क साधला. दुबेने नागपूरच्या फ्रेण्डस कॉलनीतील रहिवासी चंद्रशेखर पंजाबराव आत्राम (वय ४०) याच्यासोबत महंतो यांची ओळख करून दिली. नंतर या दोघांनी नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देण्याची थाप मारून वेगवेगळ्या खर्चासाठी ९ जुलै ते १४ सप्टेंबर २०१९ या कालावधीत महंतो यांच्याकडून १ लाख, ५५ हजार रुपये घेतले. आरोपींनी महंतो यांना प्रभावित करण्यासाठी खोट्या ओळखपत्राचाही आधार घेतला. दरम्यान, ही रक्कम घेतल्यानंतर त्यांनी बड्या रकमेची मागणी केली. त्यावेळी महंतो यांना संशय आल्याने त्यांनी चाैकशी सुरू केली असता आरोपींची बनवाबनवी उघड झाली. त्यामुळे त्यांनी आपली रक्कम आरोपींकडे परत मागितली. त्यांनी रक्कम देण्यासाठी बऱ्याच तारखा दिल्या. मात्र, रक्कम परत केली नाही. त्यामुळे महंतो यांनी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींची चाैकशी सुरू आहे.
दुबे-आत्रामचे अनेक साथीदार
आरोपी दुबे आणि आत्राम यांचे अनेक साथीदार या फसवणुकीत सहभागी आहेत. त्यांची एक मोठी टोळीच येथे कार्यरत आहे. यापूर्वीही या टोळीने अनेकांची एमबीबीएस ॲडमिशनच्या नावाखाली फसवणूक केली आहे.