लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - एमबीबीएसला ॲडमिशन करून देण्याची बतावणी करून एका चाैकडीने राजू गजानन येरणे (वय ५२) यांचे ४० लाख रुपये हडपले. धंतोली पोलिसांनी याप्रकरणी रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
शंकर मारोती मानवटकर (रा. गुमथळा, कामठी), सचिन उत्तलकर, साैरभ श्रीवास्तव आणि उल्हास नेवारे, अशी आरोपींची नावे आहेत. राजू येरणे वर्धा मार्गावरील स्नेहनगरात राहतात. त्यांच्या मुलीची एमबीबीएसला ॲडमिशन करून देण्याच्या नावाखाली आरोपी मानवटकर, उत्तलकर, श्रीवास्तव आणि नेवारे या चाैघांनी येरणे यांना १४ जुलै ते १० नोव्हेंबर २०१७ या कालावधीत वारंवार संपर्क केला. त्यांना अजनी चाैकाजवळच्या रामकृष्णनगरात असलेल्या भारतीय उच्च माध्यमिक शिक्षा परिषद विदर्भ प्रदेश सेंटर नामक आपल्या कार्यालयात बोलविले आणि
त्यांच्याकडून रोख तसेच आरटीजीएसच्या माध्यमातून वेळोवेळी ४० लाख रुपये घेतले. आता चार वर्षे झाली तरी आरोपींनी येरणेंच्या मुलीची ॲडमिशन करून दिली नाही. घेतलेली रक्कमही परत केली नाही. आरोपींचा फोलपणा लक्षात आल्यामुळे येरणे यांनी धंतोली ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींची चौकशी केली जात आहे.