लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - महाबीज अकोलामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बापलेकासह चौघांनी एका तरुणाकडून ८.५० लाख रुपये उकळले. दोन वर्षे झाली तरी नोकरी लावून दिली नाही किंवा घेतलेली रक्कमही परत केली नाही. त्यामुळे सदर तरुणाने धंतोली पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणात पोलिसांनी आनंद केशवराव वानखेडे, पिंटू ऊर्फ स्वप्निल आनंद वानखेडे (रा. सौभाग्यनगर हुडकेश्वर), रविशंकर कसाडे ऊर्फ देशमुख (रा. उदरी, कुही), दिगांबर ठाकरे (रा. सालेकसा, अंबाटोली गोंदिया) या चाैघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
योगेश प्रकाश तराळे (वय ३०) असे फसगत झालेल्या तरुणाचे नाव असून तो अजनीच्या वसंतनगर, जुना बाबुळखेडा भागात राहतो. धंतोलीतील नेताजी मार्केटमध्ये त्याचे पेंटिगचे दुकान आहे. दोन वर्षांपूर्वी उपरोक्त आरोपी त्याच्या संपर्कात आले. महाबीजमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या जागा निघाल्या असून आरोपी दिगांबर ठाकरे हा महाराष्ट्र बियाणे महामंडळ मर्यादित महाबीज भवन कृषीनगर अकोला येथे अधिकारी आहे. त्यामुळे तुला नोकरी लावून देतो, अशी उपरोक्त आरोपींनी थाप मारली. ८.५० लाख रुपये नोकरीसाठी द्यावे लागेल, असे सांगून आरोपींनी १० जानेवारी २०१८ ते २५ सप्टेंबर २०१९ या कालावधीत तराळेकडून रक्कम घेतली. तराळेला त्यांनी बनावट नियुक्तीपत्रही दिले. मात्र प्रत्यक्ष नोकरी दिली नाही. ते टाळाटाळ करीत असल्याने तराळेला संशय आला. त्यामुळे त्याने आपली रक्कम परत मागितली. तो पोलिसांकडे जाऊ शकतो, हे लक्षात आल्याने आरोपींनी त्याला एक लाख रुपये परत केले. उर्वरित रक्कम मात्र परत केली नाही. तो तगादा लावत असल्याचे पाहून पुन्हा पैसे परत मागितले तर जीवे ठार मारू, अशी धमकी दिली. त्यामुळे तराळेने धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर शनिवारी या प्रकरणात उपरोक्त आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील चौकशी सुरू आहे.
---