लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - गोदरेजच्या कपाटाची चावी बनवून देण्याच्या नावाखाली दोन भामट्यांनी कपाटातील रोख आणि सोन्याच्या दागिन्यांसह तीन लाखांचा ऐवज लंपास केला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी दुपारी ही घटना घडली.
पांडुरंग गणपतराव नवघरे (वय ७३) हे नंदनवनमधील दर्शन कॉलनीत राहतात. शुक्रवारी दुपारी त्यांच्याकडे दोन भामटे आले. कुलूपाची चावी बनवायची आहे का, अशी आरोपींनी विचारणा केली. नवघरे यांनी दिलेल्या कुलूपाची चावी त्यांनी बनवून दिली. त्यानंतर आरोपींनी त्यांना गोदरेजच्या कपाटाची दुसरी एक चावी बनवून दिली. आरोपी निघून गेल्यानंतर नवघरे यांनी चावी कपाटाच्या लॉकरला लावून बघितली असता ती लॉकमध्ये फसली (अडकली). शनिवारी सकाळी ११.३० वाजता आरोपी पुन्हा त्यांच्या घराकडे आले तेव्हा नवघरे यांनी ती चावी कपाटात फसल्याचे आरोपींना सांगितले. त्यावरून दुरुस्तीच्या नावाखाली आरोपी नवघरे यांच्या घरात शिरले. त्यांनी ती चावी बाहेर काढण्याचा बनाव करताना कपाटाच्या लॉकमध्येच तोडली. त्याचवेळी कपाटात ठेवलेले २० हजार रुपये आणि सुमारे पावणेतीन लाखांचे सोन्याचे दागिने बेमालूमपणे काढून घेतले. कपाटाचे लॉक आणि लॉकमध्ये तुटलेली चावी काढण्यासाठी सामान घेऊन येतो, अशी बतावणी करून आरोपी पळून गेले. बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने नवघरे यांनी दुसऱ्या चावीवाल्याला आणून कपाटाचे लॉक उघडले. आतमध्ये पाहणी केली असता त्या भामट्यांनी रोख आणि दागिने चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. नवघरे यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्या भामट्यांचा शोध घेतला जात आहे.
----