अमितकुमार अशोककुमार सिंग (वय ४५) असे तक्रारदारांचे नाव आहे. ते गोपालनगरात राहतात. त्यांची कोलकाता येथे सदनिका आहे. ती भाड्याने देण्याच्या उद्देशाने त्यांनी ९९ एकर डॉट कॉमवर पोष्ट अपलोड केली होती. ५ ते ११ सप्टेंबर दरम्यान एका आरोपीने सिंग यांच्याशी संपर्क साधला. आर्मीत नोकरी करतो, असे सांगणाऱ्या या भामट्याने सदनिकेचे भाडे वगैरे ठरवून सिंग यांना एक क्यूआर कोड पाठविला. स्कॅन केल्यानंतर तुम्हाला रक्कम मिळेल, असे सांगणाऱ्या या भामट्याने पाठविलेला क्यूआर कोड स्कॅन करताच आरोपीने सिंग यांच्या खात्यातून २५ हजार रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सिंग यांनी सोमवारी प्रतापनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
---