नागपूर : अनेक वर्षांची मैत्री असल्याने ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच केसाने गळा कापल्याची घटना मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. एका ज्येष्ठ नागरिकाची ३१ धनादेशांवर बनावट स्वाक्षरी करून तब्बल सव्वाबारा लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात मित्र व त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवकुमार रामचंद्र तिवारी (६२) हे सरकारी कंत्राटदार होते. त्यांची नवनीत लांडगे यांच्याशी चांगली ओळखी होती. २०१० मध्ये दोघांनीही भागीदारीतून श्रीराम लॅंड डेव्हलपर्स ॲंड बिल्डर्स ही फर्म सुरू केली. नवनीत लांडगे एका को-ऑपरेटिव्ह बॅंकेत कामाला असल्याने त्याची पत्नी देवयानी हिला फर्ममध्ये तिवारी यांचे भागीदार करण्यात आले. त्यांनी भागीदारीतच बैलवाडा येथे तीन एकर जमीन विकत घेतली व देवयानी लांडगे तसेच तिवारी यांच्या पत्नीच्या नावे ले आऊट बनविले.
या फर्मचे खाते सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेत होते. त्यानंतर नवनीतच्या सांगण्यावरून २०१३ साली गोधनी येथील श्रीराम अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेत खाते काढण्यात आले. त्याच बॅंकेतून सर्व व्यवहार होत होते. नवनीतच ग्राहकांकडून येणारे पैसे खात्यात भरत होता. तिवारी व देवयानी लांडगे यांच्या खात्याचे चेकबुकदेखील त्याच्याकडेच असायचे. तिवारी यांना काहीतरी घोळ होत असल्याचा संशय आला. त्यांनी त्यामुळे स्टेटमेन्ट तपासले असता मार्च २०१३ ते १७ डिसेंबर २०१८ या कालावधीतील ४७ व्यवहार संशयास्पद असल्याचे जाणवले.
बॅंकेकडून त्यांनी व्हाऊचरची झेरॉक्स प्रत मागितली असता चेकवर त्यांची बनावट स्वाक्षरी असल्याची बाब समोर आली. त्यावर देवयानी लांडगे यांचीदेखील स्वाक्षरी नव्हती. व्हाऊचरवरील सर्व पैसे देवयानीच्या खात्यात ट्रान्सफर झाले होते. लांडगे दांपत्याने अशा प्रकारे तिवारी यांची १२ लाख २७ हजार ४२६ रुपयांनी फसवणूक केली. तिवारी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी लांडगे दांपत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
विनासंमती व्हाऊचरद्वारे पैसे ट्रान्सफर
लांडगेने फर्मच्या जॉइंट अकाऊंटवरून ३१ धनादेशावर तिवारी यांची बनावट स्वाक्षरी करून ९ लाख ४८ हजार रुपये काढले. तर १६ व्हाऊचरद्वारे २ लाख ७९ हजार ४२६ रुपये देवयानी लांडगे यांच्या स्वतंत्र खात्यावर ट्रान्सफर केले.