नागपूर : ‘पार्ट टाईम जॉब’ची ऑफर देत त्यानंतर ‘टास्क’च्या नावाखाली नफ्याचे आमिष दाखवत फसवणूक करण्याचा पॅटर्न सायबर गुन्हेगारांकडून अवलंबविल्या जात आहे. मागील दोन महिन्यात यासंदर्भातील अनेक प्रकरणे समोर येऊनदेखील नागरिकांनी यापासून धडा घेतलेले नाही. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीला अशाच पद्धतीने सायबर गुन्हेगारांनी तब्बल ३५ लाखांहून अधिक रकमेचा गंडा घातला.
सौरभ बाबाराव घवघवे (५७, वाठोडा) यांना ११ जुलै रोजी एका मोबाईल क्रमांकावरून संपर्क करण्यात आला. त्यानंतर टेलिग्रामवरील एका खात्यावरून त्यांना पार्ट टाईम जॉबची ऑफर देण्यात आली. काही विशिष्ट टास्क देण्यात येतील व ते पूर्ण झाल्यावर खूप नफा मिळेल असे आमिष दाखविण्यात आले. घवघवे यांनी त्याला होकार दिला. त्यांनी प्राथमिक टास्क पूर्ण केल्यावर त्यांना गुंतविलेल्या पैशांवर नफा झाला. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. आणखी गुंतवणूक केल्यास फार अधिक नफा होईल, असे आमिष त्यांना दाखविण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या टास्कच्या नावाखाली गुन्हेगार त्यांच्याकडून पैसे उकळत गेले.
घवघवे त्यांच्या बोलण्याला फसले व त्यांनी तब्बल ३५.६० लाखांची गुंतवणूक केली. मात्र नफा मिळाला नसल्याने घवघवे यांनी पैसे परत मागितले. मात्र आरोपींनी पैसे परत पाहिजे असतील तर आणखी पैसे गुंतवावे लागतील असे सांगितले. आपली फसवणूक झाल्याची बाब घवघवे यांना लक्षात आली. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.