नागपूर: परदेश प्रवासाच्या नावाखाली मुंबईतील एका ट्रॅव्हल एजंटने मुलगा आणि पुतण्याच्या मदतीने एका व्यावसायिकाची ४० लाखांची फसवणूक केली आहे. मानकापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सईद अहमद अंसारी (५८, मुबारक टॉवर, कुर्ला पश्चिम, मुंबई), वसीम उर्फ वसीम उमर (२३, दामुपुरा, भंजन, उत्तर प्रदेश), फरहान सईद अंसारी (२२) आणि अदनान सईद अंसारी(२३) अशी आरोपींची नावे आहेत. बिलाल मोहम्मद उर्फ रिझवान कुरेशी (२७, मानकापूर) यांचे आईवडील २०२३ पासून सौदी अरबमध्ये राहतात. त्यांच्या व्हिजा व तिकीटाचे काम सईद अंसारीने केले होते. सईदने बिलाल यांना इंटरनॅशनल एअरलाईन टिकीट काढण्याच्या व्यवसायाचा प्रस्ताव ठेवला व बिलाल यांनी मकाऊ इंटरनॅशनल नावाने एअर लाईन टिकीट काढण्याचे काम सुरू केले. बुकींग आल्यावर बिलाल हे सईची कंपनी अल-फाजचे खात्यामध्ये पैसे पाठवत होते.
सईदचा भाचा वसीम उर्फ वसीम उमर हा बिलाल यांना ऑनलाईन टिकीट पाठवायचा. सईदची अल-फाज कंपनी त्याची मुले फरहान व अदनान यांच्या नावाने आहे. मे २०२३ मध्ये बिलाल यांच्याकडे सौदीला जाणाऱ्या ४०० जणांचे मोठे बुकींग आले. सईदने तिकीटाचे दर सांगून २५ टक्के रक्कम देण्यास सांगितले. बिलाल यांनी ग्राहकांकडून रक्कम घेऊन सईदच्या कंपनीच्या बॅंक खात्यावर ४० लाख रुपये पाठविले. सईदने बिलाल यांना पीएनआर क्रमांक पाठविला व जसे जसे पासपोर्टचे तपशील येतील त्याप्रमाणे तिकीट अपडेट होईल, असे सांगितले. पूर्ण पैसे दिल्यावर तिकीट मिळेल असेदेखील सईदने सांगितले. मात्र आरोपींनी कुठलेही तिकीट पाठविले नाही.
बिलाल यांनी पीएनआर तपासला असता तो अगोदरच रद्द झाला असल्याची बाब समोर आली. त्यांनी सईदला विचारणा केली असता पैसे उशीरा आल्याने तिकीट रद्द झाल्याचे सांगितले. आरोपींनी एका आठवड्यात पैसे परत येतील असादेखील दावा केला. मात्र त्यांनी प्रत्यक्षात कुठलेही पैसे पाठविले नाही. आरोपींनी पाठविलेला पीएनआर क्रमांक व मेल बनावट असल्याची बाब बिलाल यांना समजली. आरोपींनी बिलाल यांच्या फोनला प्रतिसाद देणेदेखील बंद केले. अखेर त्यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपींविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.