नागपूर : निराधार मदतीचे पैसे मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिलेने ८५ वर्षीय महिलेची फसणूक करत सोन्याचे दागिने लंपास केले. शांतीनगर येथील दहीबाजार परिसरात भरदिवसा ही घटना घडली.
मंगळवारी तेजुबाई लहानुजी मोहाडीकर या भाजीपाला घेण्यासाठी दहीबाजारात गेल्या होत्या. त्यावेळी ४५ वर्षांची एक महिला त्यांच्याजवळ आली व त्यांच्याशी बोलू लागली. निराधार योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे मिळू शकतात. तुम्ही अर्ज करा, माझी बॅंकेत ओळख आहे व लगेच पैसे मिळतील, असा तिने दावा केला. तेजुबाईंनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला व तिच्यासोबत हॉटेल प्राईमजवळ गेल्या. तेथे गेल्यावर महिलेने प्रक्रियेसाठी काही पैसे भरावे लागतील, असा कांगावा केला. तेजुबाईंकडे तेवढे पैसे नव्हते. तिने गळ्यातील व कानातील दागिने गहाण ठेवून लगेच पैसे घेऊ व बॅंकेतील पैसे मिळाले की दागिने सोडवू, असे तेजुबाईंना म्हटले. तिच्यावर विश्वास ठेवत त्यांनी तिला १६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने दिले. बराच वेळ झाल्यावरही महिला परत न आल्याने तेजुबाईंना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी घरी जाऊन त्यांच्या नातीला याची माहिती दिली. त्यानंतर शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन शांतीनगर येथे पोलीस उपनिरीक्षक चांदेकर यांनी आरोपीविरूद्ध कलम ४०६, ४२० भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.