नागपूर : महामेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी महेंद्र वसंतराव पडघन (प्रगती कॉलनी, वर्धा मार्ग) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
आरोपी महेंद्र हा त्रिवेणी अनिल भोयर (५२, मंजुळा अपार्टमेंट) यांच्या घरच्या खानावळीत नेहमीच जात होता. त्याने तो महामेट्रोत काम करत असल्याची बतावणी केली होती. त्रिवेणी भोयर यांनी मेट्रोत मुलीसाठी काही नोकरी आहे का, अशी सहज विचारणा केली. यावर महामेट्रोत भरपूर नोकऱ्या असून रिक्त जागांवर भरती करणे हे माझ्याच हातात आहे, असा त्याने दावा केला. त्याने नोकरी लावून देण्याच्या नावाखाली भोयर यांच्याकडून ऑगस्ट २०२२ मध्ये मुलीची कागदपत्रे व रोख ७० हजार रुपये घेतले. मात्र, त्याने कुठलीही नोकरी लावून दिली नाही. भोयर यांनी त्याला पैसे परत मागितले; परंतु त्याने पैसे परत देण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भोयर यांनी धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.