नागपूर : १८.२२ कोटींच्या जमीन खरेदी-विक्री प्रकरणात निर्माण झालेल्या वादानंतर सदर पोलिसांनी सीएस पिता-पुत्र आणि बिल्डरसह पाच आरोपींविरुद्ध गुन्हेगारी कट रचून फसवणूक करणे तसेच धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये सर्वच्या सर्व ‘बहुचर्चित’ असल्याने संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नारायण चंदीराम ढेमले (७२, रा. फ्रेंड एन्क्लेव्ह), अतुल नारायण ढेमले (४५), विजय किम्मतराव रमानी (६२, रा. शिवाजीनगर), गाैरीशंकर जगनमल कच्चानी (५४, रा. जरीपटका) आणि कमलेश चंद्रशेखर दाडे (वय ६०, रा. स्वामी अपार्टमेंट, रामदासपेठ) अशी आरोपींची नावे आहेत. यातील नारायण ढेमले आणि रमानी सीए असून, अन्य आरोपी बिल्डर डेव्हलपर्स आहेत.
वर्धा मार्गावरील चिंचभुवन परिसरात ही जागा असून, आज तिची किंमत ५० ते १०० कोटींच्या घरात आहे. आरोपींनी मूळ जमीन मालकाकडून या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी घेतली. त्यानंतर न्यू कॉलनी सदर येथील नावेद साजिद अली यांना (पार्थ ५ सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क, लिंक रोड, सदर) उपरोक्त आरोपींनी ३ मे २००६ ला १८.८९ एकर शेतजमीन विकण्याचा करार केला. पुढे ८ मे ते २५ ऑगस्ट २००८ दरम्यान १८ कोटी, २२ लाख रुपयांत हा साैदा पक्का झाला. त्यावेळी पैशाचा व्यवहार करून एक करार करण्यात आला. या जमिनीवर एनए लेआऊट टाकून देण्याचे आश्वासन आरोपींनी त्यावेळी अली यांना दिले. मात्र, महिनेच नव्हे, तर अनेक वर्षे होऊनही आरोपींनी करारानुसार या जमिनीवर एनए लेआऊट टाकून दिले नाही किंवा रक्कमही परत केली नाही. त्यामुळे त्यांच्यात बऱ्याचदा वाद झाले. अनेकदा समेटाच्या बैठकाही झाल्या.
एसआयटीकडेही गेले होते प्रकरण
तत्कालीन पोलीस आयुक्त व्यंकटेशम यांनी २०१७ मध्ये शहरातील भूमाफियांवर कारवाई करण्यासाठी एक एसआयटी गठित केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, अली यांनी एसआयटीकडे त्यावेळी तक्रार केली असता, आरोपींनी त्यावेळी विक्रीपत्र अन् जमीन एनए करून देण्याचे लिखित आश्वासन दिले होते. सेटलमेंट झाल्याने त्यावेळी आरोपींवर गुन्हा दाखल झाला नव्हता.
अखेर कोर्टातून मिळाला दिलासा
सेटलमेंट करणाऱ्या आरोपींनी नंतर मात्र शब्द फिरवला. ते जमिनीची विक्री अन् एनए करून देण्यास तयार नसल्याने अली यांनी पुन्हा पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, प्रकरण दिवाणी असल्याचे सांगून पोलिसांनी पदर झटकल्याने अखेर अली यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणातील कागदपत्रे तपासल्यानंतर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, सदर पोलिसांनी बुधवारी आरोपी ढेमले पिता-पुत्र तसेच कच्चानी, दाढे आणि रमानी यांच्याविरुद्ध गुन्हेगारी षड्यंत्र करून फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल केले.
मूळ जमीन मालकाचीही फसवणूक
या प्रकरणात आरोपींनी मूळ जमीन मालकाचीही फसवणूक केल्याचा आरोप आहे. सर्वच्या सर्व आरोपी वेगवेगळ्या मार्गाने प्रभाव टाकून प्रकरण दडपण्यात वाकबगार असल्याने त्यांच्यावर ठोस कारवाई झाली नव्हती. व्यवहाराला वेगळी कलाटणी देऊन मूळ जमीन मालकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न यापूर्वी झाला होता, असाही आरोप आता केला जात आहे.