नागपूर : कॅनडामध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने सायबर गुन्हेगारांनी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवाराची दोन लाख रुपयांची फसवणूक केली आहे. यशोधरा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पिवळी नदीजवळ राहणारे भाऊराव धडाडे हे नोकरीच्या शोधात होते. ऑक्टोबर २०२१ मध्ये संकेतस्थळाच्या माध्यमातून नोकरी शोधत असताना, धडाडे यांना कॅनेडा येथील शिपली फार्म हाऊसमध्ये पर्यवेक्षकाच्या नोकरीसंदर्भात एक मेल आला. धडाडे यांनी नोकरीसाठी होकार दिला. त्यानंतर त्याला 'वर्किंग व्हिसा' मिळवण्यासाठी कथित एजंट मेलिसा लनाराशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. मेलिसाशी संपर्क झाल्यावर प्रोसेसिंग शुल्काच्या नावाखाली त्यांना २ लाख २५० रुपये पाठविण्यास सांगण्यात आले. धडाडे यांनी रक्कम पाठविली. त्यानंतर त्यांच्या ई-मेलवर अपॉईन्टमेन्ट लेटरदेखील आले. व्हिसाच्या प्रक्रियेसाठी त्यांना दिल्ली येथे बोलविण्यात आले. धडाडे दिल्लीला गेले असता संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क झाला नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांना समजले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.