लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - वेगवेगळी कर्ज प्रकरणे सादर करून बँक तसेच खासगी वित्तीय संस्थेकडून लाखोंचे कर्ज उचलणाऱ्या दोन दाम्पत्यासह सहा जणांविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
दीपक बाबूराव ठाकरे (वय ४७, रा. दिघोरी), सचिन कवडूजी माकडे (वय ४०, रा. रमणा मारोतीनगर), विक्रांत आणि त्याची पत्नी पिंकी धुर्वे (रा. बैरामजी टाऊन आदिवासीनगर) तसेच अमित आणि मनिषा गायकवाड (रा. श्रीरामनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
या सर्वांनी हुडकेश्वरमधील शिवाजीनगर गृहनिर्माण संस्थेतील एका अपार्टमेंटमध्ये ११, १२, २१ आणि २२ क्रमांकाची सदनिका विकत घेतली होती. या सदनिकांची त्यांनी एकत्र विक्रीपत्र करून घेतले होते. त्यातील ११ आणि २१ क्रमांकाची सदनिका त्यांनी सारस्वत बँकेत गहाण ठेवून त्यावर कर्ज उचलले. नंतर रवींद्र मनोहर मडगे (वय ३६, रा. गणेशनगर पारशिवनी) यांच्या फायनान्स कंपनीतून २४ लाख, ६८ हजार तर आरोपी अमित आणि मनिषा गायकवाड (रा. श्रीरामनगर) या दोघांनी वेगळे विक्रीपत्र सादर करून पुन्हा २२ लाख, ५७ हजारांचे कर्ज घेतले.
२१ ऑक्टोबर २०२० ते ५ मार्च २०२१ दरम्यान आरोपींनी ही बनवाबनवी केली. ती लक्षात आल्यानंतर मडगे यांनी हुडकेश्वर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
----