नागपूर : ‘लोकमत’ आणि नागपूर महापालिकेच्या नावाने पुरस्कार प्रदान करण्याचे फसवणुकीचे रॅकेट चालविणाऱ्या टोळीतील महिला सदस्याला सीताबर्डी पोलिसांच्या पथकाने बुधवारी अटक केली. हिमांशी राजकुमार कोठेकर (शांतीनगर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी गोविंद बेलसरे याचा पोलिस शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर दोन पोस्टर टाकून या टोळीने मानकापूर इनडोअर स्टेडियममध्ये मे महिन्यात लोकमत आणि नागपूर महानगरपालिकेच्यावतीने पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येत असल्याचा दावा केला होता. या सोहळ्याला अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, कियारा अडवाणी उपस्थित राहणार असल्याचे सांगत शहरातील काही ब्युटिशियन्सना पुरस्कार देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून १५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. त्यांचे व्हिडिओ बाईटदेखील (मुलाखती) घेण्यात आले. ब्युटिशियन कीर्ती तिवारी यांनी ‘लोकमत’शी संपर्क साधला असता संपूर्ण प्रकरण समोर आले. दरम्यान, बुधवारी दुपारी कीर्ती तिवारीचा डमी भाऊ हिमांशी कोठेकरला भेटायला पाठविण्यात आला व त्यावेळी टोळीने पुन्हा १५ हजार रुपयांची मागणी केली. आरोपींनी सांगितल्यानुसार हिमांशी कोठेकर ही डमी भावाला सीताबर्डीच्या मॉलसमोर भेटली. यादरम्यान साध्या वेशातील पोलिसांनी हिमांशीला तेथेच पकडले. यावेळी हिमांशी या रकमेची पावतीही देणार असल्याचा दावा करत राहिली.
हिमांशीची चौकशी केल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी भादंवि कलम ४१९, ४६५, ४६८, ४७१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात महाल रहिवासी गोविंद बेलसरे हा मुख्य आरोपी असल्याचे हिमांशीने पोलिसांना सांगितले आहे. त्याच्या सांगण्यावरून ती ब्युटिशियन्सकडून पैसे घेत होती. पोस्टरवर लोकमत आणि मनपा यांचा लोगो असल्याने सर्वांनीच त्यावर विश्वास ठेवला होता. ती जमा केलेले पैसे गोविंदच्या खात्यातच जमा करणार होती.
महापालिकाही करणार तक्रार
विशेष म्हणजे या टोळीने सोशल मीडियावर टाकलेल्या कार्यक्रमाच्या पोस्टरवर ‘लोकमत’सह महानगरपालिकेचादेखील लोगो आहे. महानगरपालिकेकडूनदेखील या प्रकरणात पोलिसांत तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली. महानगरपालिकेने असा कोणताही कार्यक्रम आयोजित केलेला नाही. संबंधित टोळीने महानगरपालिकेच्या लोगोचा गैरवापर करून प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला आहे. कोणीही अशा टोळ्यांच्या जाळ्यात फसवून आर्थिक व्यवहार करू नये व त्वरित पोलिसांना याची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.