नागपूर : रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूकीचे मोठे रॅकेट समोर आले आहे. भावाबहिणीने नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांना जाळ्यात ओढत तब्बल १२.६५ लाखांचा गंडा घातला. फसवणूकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. अलिशा आनंद कैथा (२३) व अंकित आनंद कैथा (२१, संजीवनी क्वॉर्टर, यशोधरानगर) अशी आरोपी भाऊबहिणीची नावे आहेत. रेल्वेत आपली वरपर्यंत ओळख असल्याचे सांगत त्यांनी फसवणूकीचे रॅकेट रचले. गणेशन शिवलाल सागर (६१, पाचपावली) यांच्या मुलाला नोकरी हवी होती. गणेशन यांची त्यांचा मित्र दीपक तुमडामच्या माध्यमातून २०२१ साली आरोपींशी ओळख झाली होती.
त्यानंतर त्यांची धंतोली बगिच्यात भेटदेखील झाली. ५ मे २०२१ ते २२ मे २०२३ या कालावधीत अलिशा व अंकीतने त्यांच्याकडून सव्वातीन लाख रुपये घेतले. मात्र कुठलीही नोकरी लावून दिली नाही. त्यांना विचारणा केली असता ते आज काम होईल, उद्या काम होईल, असे म्हणत टाळाटाळ करत होते. आपली फसवणूक झाल्याचे गणेशन यांच्या लक्षात आले. त्यांनी आणखी माहिती काढली असता आणखी तीन जणांनादेखील आरोपींनी असेच जाळ्यात ओढले होते. आरोपींनी त्यांच्याकडून एकूण १२.६५ लाख रुपये उकळले होते. त्यांना पैसे परत मागितले असता आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला. अखेर गणेशन यांनी धंतोली पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर ठकबाज भाऊबहिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. त्यांनी या पद्धतीने आणखी लोकांनादेखील फसविले असल्याची शक्यता आहे.