लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : सहा जणांनी संगनमत करून दाेघांना विश्वासात घेत लिपिकपदी नाेकरी मिळवून देण्याची बतावणी केली. यासाठी त्यांनी दाेघांकडून तब्बल २१ लाख रुपये घेत त्यांची फसवणूक केली. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भूगाव येथे घडली असून, पाेलिसांनी गुरुवारी (दि. २) गुन्हा दाखल केला.
आराेपींमध्ये जितेंद्र मधुकर गावंडे (रा. सुदर्शननगर, हुडकेश्वर, नागपूर), अतुल किशन लाेखंडे (रा. सासवड राेड, हडपसर, पुणे), अविनाश सुरेश काळे (रा. साईनगर, दिघाेरी, नागपूर), नीलेश अरुण डाेंगरे (रा. हातरूल, जिल्हा अकाेला), माणिक चिंतामण गवारगुरू (रा. खकटा, ता. तेल्हारा, जिल्हा अकाेला) व याेगेश दामूअण्णा टाेंग (रा. शहाणे लेआऊट, नागपूर) या सहा जणांचा समावेश आहे.
या सहाही जणांनी राेशन सुरेश आंबिलडुके (२९) व त्याचा मित्र वसंता दयाराम वंजारी (दाेघेही रा. भूगाव, ता. कामठी) यांच्याशी संपर्क साधून त्यांना आधी विश्वासात घेतले व नंतर दाेघांनाही कमर्शियन क्लर्कपदी नाेकरी मिळवून देण्याची बतावणी केली. दाेघेही बेराेजगार असल्याने तसेच त्यांना नाेकरीची गरज असल्याने त्यांनी यासाठी हाेकार दर्शविला. यासाठी त्यांनी दाेघांनाही रेल्वे टीसीच्या ट्रेनिंगचे बाेगस पत्रही पाठविले हाेते.
नाेकरी मिळवून देण्यासाठी दाेघांकडून त्यांनी टप्प्याटप्प्याने २१ लाख रुपये घेतले. ते मागणी करून नाेकरी देत नाहीत तसेच दिलेली रक्कम परतही करीत नाहीत, असे लक्षात येताच दाेघांनीही पाेलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून माैदा पाेलिसांनी सहा जणांविरुद्ध भादंवि ४२०, ४६५, ४६८, ४७१, १२० (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक प्रमाेद चाैधरी करीत आहेत. वृत्त लिहिस्ताे या प्रकरणात कुणालाही अटक केली नव्हती किंवा चाैकशीसाठी ताब्यात घेतले नव्हते.