लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एअरपोर्टवर वाहन चालकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन महिलांनी एक व्यक्तीची फसवणूक केली. पीडित व्यक्ती (वय ३५) एमआयडीसी परिसरात राहते. ८ ते १३ जुलैच्या दरम्यान त्याला पूजा शर्मा आणि नीतू सिंग या दोघींनी वेगवेगळ्या वेळी फोन करून एअरपोर्टवर ड्रायव्हरच्या पदासाठी तुमची निवड झाली, अशी थाप मारली. तुमची आयडी तयार करायचा आहे, असे सांगितले. त्या बदल्यात दोन हजार रुपये आपल्या खात्यात जमा करण्यास सांगितले. हे दोन हजार रुपये जमा केल्यानंतर आरोपींनी पीडित व्यक्तीला युनिफॉर्मकरिता ७६०० रुपये आणि नंतर इन्शुरन्स तसेच पोलीस व्हेरिफिकेशनसाठी १५ हजार ५०० रुपये जमा करण्यास सांगितले. ही रक्कम जमा केल्यानंतर आरोपींनी पुन्हा १२ हजार ५०० रुपये मागितले. रक्कम जमा केल्यानंतर आरोपी वेगवेगळे कारण सांगून वारंवार पैसे मागत असल्याची पीडितेला शंका आली. त्यामुळे त्यांनी एअरपोर्टवर संपर्क केला असता आरोपी पूजा शर्मा आणि नीतू सिंग या दोघी त्याची फसवणूक करीत असल्याचे लक्षात आले. त्यावरून पीडित व्यक्तीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 12:17 AM