दयानंद पाईकराव, नागपूर : शनार्क इंडस्ट्रीज आणि गॅस एजन्सीत गुंतवणूक केल्यास चांगला नफा देण्याचे पिता-पुत्रांनी आमीष दाखविले. दोघांनी ४५ लाख रुपये घेऊन कोणताच नफा न देता पैसेही परत करण्यास नकार दिला. या प्रकरणी पिता-पुत्रांविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सारंग प्रशांत काळे (४५) आणि प्रशांत शंकरराव काळे (७०) दोघे रा. शिवाजीनगर अशी फसवणूक करणाऱ्या आरोपी पिता-पुत्रांची नावे आहेत. अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे विनयकुमार राधेशाम भट्टड (४२, रा. शंकरनगर, शिवाजीनगर) यांचे आरोपी सारंगसोबत मैत्रीचे संबंध होते. ९ ऑक्टोबर २०१९ ते ९ जुलै २०२३ दरम्यान आरोपी सारंग आणि प्रशांत हे विनयकुमार यांच्या घरी आले. त्यांनी शनार्क इंडस्ट्रीज तसेच गॅस एजन्सीत गुंतवणूक केल्यास चांगला फायदा देण्याचे आमीष दाखविले. त्यांच्यावर विश्वास ठेऊन विनयकुमार यांनी त्यांच्या व्यवसायात ४५ लाख १० हजार रुपयांची गुंतवणूक केली. आरोपींनी त्यांना गुंतवणुकीची सिक्युरिटी म्हणून नमुद रक्कमेचा चेक दिला. त्यानंतर आरोपींनी विनयकुमार यांना कोणताही नफा दिला नाही. विनयकुमार यांनी पैसे परत मागितले असता आरोपींनी पैसेही देण्यास नकार दिला.
विनयकुमार यांनी चेक बँकेत वटविण्यास टाकला असता फंड नसल्याने खाते बंद असल्याने चेक परत आला. त्यांनी आरोपींना पैसे परत मागितले असता आरोपी प्रशांत काळे याने त्यांना शिविगाळ करून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. विनयकुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ४२०, ४०६, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला आहे.