मोरेश्वर मानापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वाधिक ग्राहकांना फसविले जाणारे ठिकाण म्हणजे आठवडी बाजार. वजनांची हेराफेरी आणि तराजूत लोखंडी वजनाऐवजी दगड ठेवून ग्राहकांची खुलेआम फसवणूक होणारे हे ठिकाण. ग्राहक सर्रास लुटले जात असताना बाजारातील विक्रेत्यांवर कुणाचेही नियंत्रण नाही. याकरिता ग्राहक वैधमापनशास्त्र विभागाला जबाबदार धरले तर ते दुसऱ्या विभागाकडे बोट दाखवितात. शासकीय संस्थांच्या एकमेकांकडे बोट दाखविण्याच्या भानगडीत ग्राहकांचे उघड्यांवर खिसे कापले जातात. ‘मापात पाप’ या संकेतानुसार ग्राहकांची दररोज लाखो रुपयांची लूट होत आहे.लोकमत प्रतिनिधीने नागपुरातील सर्वच भाजीपाला बाजारपेठांची पाहणी केली. ग्राहकांना वस्तू वा भाजीपाला मोजून देताना जवळपास २० टक्के विक्रेत्यांच्या वजनकाट्यावर दगड ठेवल्याचे दिसून आले. विचारणा केली असता, कुणीही तपासणी करीत नाही मग भीती कशाला? असा सवाल विक्रेत्यानेच प्रतिनिधीला केला. यावरून वैधमापनशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमित आणि आठवडी बाजारातील विक्रेत्यांच्या वजनमापांची कधीच तपासणी न केल्याचा प्रत्यय आला. इलेक्ट्रॉनिक काटे शासनाने बंधनकारक केले असतानाही विक्रेते आताही तराजूचा काटा वापरतात. याकडे कुणाचेही लक्षदिसून आले नाही. विभागाने आठवडी बाजाराची तपासणी केल्यास विक्रेत्यांमध्ये भीती निर्माण होईल आणि ग्राहकांची कधीच फसवणूक होणार नाही, असे ग्राहकाने सांगितले.आठवडी बाजार महाल, सदरचा असो वा सोमवारीपेठेतील येथे ग्राहक खुलेआम लुटला जातो आहे. वस्तू दगडाच्या वजनांनी मोजणे, वजनात हेराफेरी, काटा मारणे, प्रमाणित वजनाचा उपयोग न करणे हे प्रकार सर्रास होताना दिसतात. हेराफेरीत ग्राहकांना किलोभराची भाजी तीन पाव मिळत आहे. ग्राहकांनाही याची माहिती आहे. मात्र दाद मागण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही, त्यामुळे ग्राहकांची मुस्कटदाबी होत आहे.महापालिका क्षेत्रात १० झोनमध्ये २६ अधिकृत बाजार तर ४० पेक्षा जास्त अनधिकृत बाजार आहेत. महापालिका बाजारातील विक्रेत्यांकडून ठराविक रक्कम आकारते. मात्र वजनकाटे तपासणी करण्याची जबाबदारी वैधमापनशास्त्र विभागाकडे आहे. असे असतानाही विभागाकडून ग्राहकांच्या सुरक्षेसंदर्भात कुठलीही उपाययोजना होत नाही वा आकस्मिक तपासणी केली जात नाही. त्यामुळे विक्रेत्यांच्या मनमानीला सजग ग्राहकही बळी पडतो. विके्रत्याला ग्राहकांनी विरोध केल्यास तू तू-मै मै करण्याची वेळ येते. त्यामुळे दररोज आठवडी बाजारात ग्राहक लाखो रुपयांनी फसविला जात आहे. विक्रेत्यांची हातचलाखी रोखण्यासाठी वैधमापन विभागाने बाजारावर धाडी टाकाव्यात. विक्रेत्यांना दंडित करावे, अशी ग्राहकांची मागणी जोर धरू लागली आहे.
कॉटन मार्केटमध्ये काट्यांवर दगडकॉटन मार्केट भाजीपाला बाजारात बहुतांश विक्रेते दगडांच्या मापाने भाजीपाल्याचे मोजमाप करतात. विचारणा केली असता त्यांनी घमेल्या पासन म्हणून दगड ठेवल्याचे सांगितले आणि वजनाची शहानिशा करून दिली. ग्राहकांनी तक्रार केल्यास त्यांची समजूत घालतो. भाजीपाल्याचे वजन करताना दगड वजन काट्यात ठेवतो. ही वर्षानुवर्षे चालत आलेली बाजाराची पद्धत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कुणाचीही फसवणूक होणार नाही, यावर आम्ही दक्ष असतो. ग्राहकाने खरेदी केलेला भाजीपाला कुठेही मोजावा, वजन कमी मिळणार नाही, असे विक्रेत्याने ठासून सांगितले. याच बाजारात काही विक्रेते इलेक्ट्रॉनिक्स काट्याचा वापर करीत असल्याचे दिसून आले. ग्राहकांना तंतोतंत माप देण्याचे आमचे धोरण असल्याचे विक्रेत्याने सांगितले.