मुख्य रेल्वेस्थानकावरील कामे रखडली : त्वरित पूर्ण करण्याची मागणीनागपूर : ऐतिहासिक रेल्वे स्थानक म्हणून नागपुरातील मुख्य स्थानकाचा नावलौकिक आहे. परंतु या ऐतिहासिक रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यात भर घालण्याऐवजी ते दिवसेंदिवस विद्रुप होत आहे. सौंदर्यीकरणाच्या नावाखाली रेल्वे प्रशासनाने नागपूर रेल्वे स्थानकावर विकास कामे सुरू केली आहेत. तीन ते चार महिन्यांपासून ही विकास कामे तशीच रखडल्यामुळे रेल्वे स्थानकाच्या दर्शनीभागाला विद्रूप स्वरूप प्राप्त झाले आहे. याची त्वरित दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने ही विकास कामे पूर्ण करण्याची मागणी होत आहे.ब्रिटिशांच्या काळात नागपूर रेल्वे स्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीचे बांधकाम झाले. ही इमारत शहराच्या वैभवांपैकी एक आहे. या इमारतीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी तत्कालीन ‘डीआरएम’ बृजेश दीक्षित यांनी अनेक उपाययोजना केल्या. रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागात वाफेवर धावणारे पुरातन बुलंद इंजिन बसविले. इंग्रजांच्या काळात आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र होम प्लॅटफॉर्मवर स्थापन केले. परंतु सध्याच्या परिस्थितीकडे कटाक्ष टाकला असता, रेल्वे स्थानकाच्या इमारतीच्या सौंदर्यात भर घालण्याऐवजी या इमारतीला विद्रूप करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे की काय, असा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. प्रशासनाने हाती घेतलेली विकास कामे खोळंबल्यामुळे या इमारतीच्या सौंदर्यात बाधा येत आहे. रामझुल्याकडून रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी या भागातील दोन इमारती पाडण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले. परंतु एक इमारत पाडल्यानंतर दुसऱ्या इमारतीचे काम अर्धवट पडून आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या शेजारील इमारतीच्या भिंतीचे कामही रखडले आहे. संबंधित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे अपेक्षित असताना, रेल्वे प्रशासनाने मात्र ही कामे अर्धवट टाकल्यामुळे या ऐतिहासिक इमारतीची दुरवस्था होत आहे. त्यामुळे ही विकास कामे त्वरित पूर्ण करून रेल्वे स्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीच्या सौंदर्यात भर घालण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)बुलंद इंजिनची दुरवस्थावाफेवर धावणारे ऐतिहासिक बुलंद इंजिन नागपूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागात बसविण्यात आले. त्यासाठी एका भव्य समारंभाचे आयोजन प्रशासनाने केले. परंतु या वाफेच्या इंजिनालाही विद्रूप स्वरूप प्राप्त झाले आहे. या इंजिनखालील स्टीलच्या साखळ्या चोरट्यांनी पळविल्या. सध्या या इंजिनखाली भिकारी, मद्यपींचा मुक्तसंचार होत असल्याचे दृष्टीस पडते.
विकासाच्या नावाखाली विद्रुपीकरण
By admin | Published: July 26, 2016 2:30 AM