महाठग अजित पारसेची लेखी प्रश्नांना मोघम उत्तरे; तपास अधिकाऱ्याची उच्च न्यायालयात तक्रार
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: February 21, 2023 06:27 PM2023-02-21T18:27:33+5:302023-02-21T18:32:59+5:30
बहुचर्चित महाठग अजित पारसेकडून तपासाकरिता टाळाटाळ
नागपूर : एका डॉक्टरला ४ कोटी ३६ लाख ५० हजार रुपयांनी फसविल्याचा आरोप असलेला उपराजधानीतील बहुचर्चित महाठग अजित पारसे तपासाकरिता टाळाटाळ करतोय. त्याने लेखी प्रश्नांना मोघम स्वरुपाची उत्तरे दिली, अशी धक्कादायक तक्रार तपास अधिकाऱ्याने मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाला केली आहे.
पारसे आजारी असल्याचे सांगितले जात आहे. तो एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना तपास अधिकारी त्याच्याकडे गेले होते. त्यानंतर पारसेने त्यांना सहकार्य केले नाही. तो केवळ पोट व पाय दुखत असल्याची तक्रार करीत होता. त्याने तपास अधिकाऱ्याच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिले नाही, अशी माहिती गेल्या ८ फेब्रुवारी रोजी न्यायालयाला देण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयाने पारसेला लेखी प्रश्न देण्यास सांगितले होते. त्यानुसार पारसेला लेखी प्रश्न देण्यात आले होते. परंतु, त्याने त्या प्रश्नांना मोघम स्वरुपाची उत्तरे दिली, असे तपास अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
न्यायालयाने ही बाब लक्षात घेता संबंधित प्रश्न व त्याची उत्तरे येत्या २३ फेब्रुवारीपर्यंत रेकॉर्डवर सादर करण्याचे निर्देश तपास अधिकाऱ्याला दिले आहेत. पारसेला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे तो सध्या कारागृहाबाहेर आहे. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज अंतिम निर्णयासाठी प्रलंबित आहे.
पारसेने डॉ. राजेश मुरकुटे यांना होमिओपॅथी महाविद्यालयासाठी पंतप्रधान कार्यालयातून कोट्यवधी रुपयाचा निधी मिळवून देण्याच्या नावाखाली ४ कोटी ३६ लाख ५० हजार रुपयांनी गंडवल्याची तक्रार आहे. त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी भादंवितील कलम ३८४,४२०,४६५,४६७,४६८,४७१ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. याशिवाय, त्याने वझलवार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक मनीष वझलवार यांची कोट्यवधी रुपयाचा सीएसआर निधी मिळवून देण्यासाठी १८ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात त्याच्याविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात एफआयर दाखल आहे.