नागपूर : २० कोटींचे कर्ज मिळवून देतो, अशी बतावणी करून ‘प्रोसेसिंग’च्या नावावर दोन कोटींचा गंडा घालणाऱ्या ठकबाजाला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. मूळ तक्रारदारांपैकी एकाचे निधनदेखील झाले असून, त्याच्या पत्नीने हा मुद्दा सरकारदरबारी लावून धरला होता, हे विशेष.
आकाश मनोहर पाटील (मुंबई), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने समीर चट्टे यांना २०२१ मध्ये कर्ज हवे होते. त्यासाठी भूषण देशपांडे व अनुप गुप्ता यांच्या माध्यमातून त्यांची २०२१ मध्ये आकाश पाटीलशी भोपाळमध्ये भेट झाली. आकाशने चट्टे यांना पुण्यातील एका कंपनीकडून पाच कोटींचे कर्ज मिळवून देतो, असे सांगितले. मात्र, त्यासाठी २० लाख रुपये प्रक्रिया शुल्क लागेल, असे त्याने सांगितले. चट्टे यांनी त्यानुसार त्याला साडेसात लाख रुपये पाठविले. मात्र, तेथील संचालक मरण पावल्याने कर्ज मिळणार नाही, भोपाळमधील दिलीप बिल्डकॉनमधून २० कोटींचे कर्ज मिळवून देतो, असे सांगितले. इतके कर्ज नको असल्याचे म्हटल्यावर संंबंधित कंपनी याहून कमी कर्ज देत नसल्याचे त्याने स्पष्ट केले. अखेर चट्टे यांनी मित्र परेश खानोरकर यांच्यासोबत मिळून कर्ज घेण्याचे निश्चित केले.
सीएचे शुल्क म्हणून १.२० कोटी व अनुप गुप्ताच्या कमिशनसाठी ८० लाख लागतील, असे पाटीलने सांगितले. डिसेंबर २०२१ पर्यंत चट्टे व खानोरकर यांनी पाटीलला २ कोटी रुपये पाठविले. पाटीलने त्यांचा विश्वास बसावा यासाठी दिलीप बिल्डकॉनचा २० कोटींचा धनादेश व्हॉट्सॲपवर पाठविला. त्यानंतर रक्कम न मिळाल्याने चट्टे हे भोपाळला संबंधित कंपनीत गेले. तेथे धनादेश बनावट असल्याची बाब समोर आली. त्यामुळे चट्टे यांना मोठा धक्का बसला. त्यांनी नोव्हेंबर २०२२ ला पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. मात्र, ती तक्रार परत घेतली. यावर्षी जानेवारी महिन्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी यशश्री चट्टे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी पाटील व गुप्ताविरोधात गुन्हा दाखल केला होता.
आरोपीच्या खात्यातील १५.७० लाख गोठविले
पोलिसांनी तांत्रिक तपासाला सुरुवात केली. आरोपींच्या बँक खात्यांची माहिती मिळविण्यात आली व त्या माध्यमातून त्यांचे फोन क्रमांक, तसेच पत्ते मिळविले. त्यानंतर आकाश पाटील मुंबईतील मलाड (पश्चिम) येथे असल्याची माहिती मिळाली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २८ ऑक्टोबर रोजी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडून दोन मोबाइलसह ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर त्याच्या खात्यातील १५.७० लाख रुपये गोठविण्यात आले. पाटीलला नागपुरात आणण्यात आले व त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक अमोल देशमुख, नरेश बढेल, चंद्रशेखर घागरे, आशिष लक्षणे, प्रीती धुर्वे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
उपमुख्यमंत्र्यांकडे घेतली धाव
चट्टे यांच्या पत्नीने या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयातच धाव घेतली. संपूर्ण प्रकरण पत्राद्वारे मांडल्यानंतर उपमुख्यमंत्री कार्यालयातून संबंधित अर्ज तेथून नागपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर तपास यंत्रणेची चक्रे फिरली. २६ सप्टेंबर रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.