लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुंतवणूकदारांना २३ लाख ५४ हजार ५०० रुपयांनी लुबाडणारा पांढरकवडा (जि. यवतमाळ) येथील ठगबाज राजेश बद्रीनारायण पारिख (४५) याने त्याच्याविरुद्धचा एफआयआर व दोषारोपपत्र रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेला अर्ज फेटाळण्यात आला. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. त्यामुळे पारिखला जोरदार दणका बसला.
पारिख व इतर आरोपींविरुद्ध यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पोलिसांनी २२ मार्च २०१३ रोजी भादंविच्या कलम ४२०, ४६८, ४७१, ३४, एमपीआयडी कायद्याच्या कलम ३ व आयटी कायद्याच्या कलम ७२ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. तसेच, ३० जुलै २०१३ रोजी जेएमएफसी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. पारिख मुंबई येथील आर्यरुप टुरिझम ॲण्ड क्लब रिसोर्टस् कंपनीकरिता एजंट म्हणून काम करीत होता. ही कंपनी गुंतवणूकदारांना तीन ते चारपट परतावा देण्याचे आमिष दाखवत होती. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी या कंपनीत रक्कम गुंतवली होती. पारिखने अनेक गुंतवणूकदारांकडून ठेवी स्वीकारल्या होत्या. त्याने गुंतवणूकदारांची एकूण २३ लाख ५४ हजार ५०० रुपयांनी फसवणूक केल्याचे तपासात आढळून आले आहे.