लाेकमत न्यूज नेटवर्क
हिवराबाजार : रामटेक तालुक्यातील हिवराबाजार प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये काेराेना संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आराेग्य केंद्राच्या हद्दीत आजवर एकूण २६९ रुग्ण आढळून आले असून, यातील १२९ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यात २१ रुग्ण एकट्या हिवराबाजार येथील आहेत. विशेष म्हणजे, काेराेना रुग्णांना गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला असला तरी त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने त्यांचा मुक्तसंचार काेराेना संक्रमण वाढीस कारणीभूत ठरत आहे.
वाढत्या काेराेना संक्रमणाला आळा घालण्याबाबत आराेग्य विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, हे कार्य पाेलीस पाटलांचे असल्याचे त्यांनी सांगितले. आराेग्य तपासणी करणे, औषधे देणे, लसीकरण करणे व नागरिकांना आराेग्यविषयक सल्ला देण्याचे आपले कार्य असल्याचेही या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. आम्ही केवळ संरक्षण देताे. वरिष्ठांनी अथवा जिल्हा प्रशासनाने आदेश दिल्यास लाॅकडाऊन काळात कारवाई करू, अशी प्रतिक्रिया देवलापारचे ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांनी व्यक्त केली.
महसूल, पंचायत व शिक्षण विभागाचा काेणताही कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. यातील बहुतांश कर्मचारी आठवड्यातील तीन ते चार दिवस येतात आणि मीटिंगचे कारण सांगून काही वेळात निघून जातात. आपण हिवराबाजारला नियमित भेट देत असल्याची प्रतिक्रिया खंडविकास अधिकारी ब्रम्हनाेटे यांनी दिली. कर्मचाऱ्यांचा हा अप्रत्यक्ष असहकार लक्षात घेता, ग्रामीण भागात काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांची अंमलबजावणी करणार काेण, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करीत असूनही प्रशासन ग्रामीण भागात काहीही करायला तयार नाही.
...
कर्मचारीही पाॅझिटिव्ह
हिवराबाजार येथे बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या शाखेतील चार कर्मचाऱ्यांना काेराेनाची लागण झाली असून, हिवराबाजार प्राथमिक आराेग्य केंद्रातील सात कर्मचारी तसेच हिवराबाजारचे सरपंच, एक ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठ्याचा कर्मचारी काेराेना संक्रमित असल्याचे स्पष्ट झाले आहेत. हिवराबाजारसह परिसरातील गावांमध्ये काेराेना संक्रमण वाढत असताना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन काेराेना रुग्णांवर काेणत्याही प्रकारचे नियंत्रण ठेवायला तयार नाही.
....
१,९१७ नागरिकांचे लसीकरण
हिवराबाजार प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत काेराेना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली असून, शुक्रवार(दि. ९)पर्यंत १,९१७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी लसीकरणाला वेग देणे आवश्यक असून, नागरिकांच्या मनातील लसीविषयी असलेला गैरसमज दूर करणेही आवश्यक आहे. साेबतच गावांमधील काेराेना संक्रमितांचे बाहेर फिरणे बंद करून काेरेाना संक्रमित भागाचे सॅनिटायझेशन करणे व साफसफाई करणेही आवश्यक आहे.