भिवापूर : तालुक्यातील महालगाव-झमकोली शिवारात सध्या पट्टेदार वाघोबाने धुमाकूळ घातला आहे. वाघोबाच्या या मुक्तसंचारामुळे परिसरातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिक दहशतीत आहेत. शेतातील कामे करायची कशी? आणि पिके जगवायची कशी? असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.
महालगाव, झमकोली, बेसूर, पांजरेपार, चिखलापार, नांद हा भाग जंगलव्याप्त असून, येथे जंगलातील हिंस्र श्वापदांसह इतर वन्यप्राण्यांचा कायम संचार असतो. गत काही दिवसापासून वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार अधिकच वाढला आहे. आता तर त्यात वाघोबाने भर घातली आहे. सध्या शेतात विविध प्रकारची पिके उभी आहेत. अशात रानडुक्कर, हरणाचे कळप आदी प्राण्यांनी धुमाकूळ घातल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. रानडुकरांनी तर शेतात मोठमोठे खड्डे पाडले आहेत. हे वन्यप्राणी शेतातील उभी पिके अक्षरश: पायदळी तुडवून उद्ध्वस्त करीत आहेत. दरम्यान, शिकारीसाठी वाघोबासह त्याचे बछडे परिसरात फिरस्तीवर असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचे दिवसाढवळ्या दर्शन होत आहे. अशात वाघोबा कधी कुणाचा घात करेल, याचा नेम नाही. वन्यप्राण्यांचा शेतात उपद्व्याप सुरू असल्यामुळे पिकांच्या बचावासाठी शेतकऱ्यांना शेतात जागली करणे आवश्यक ठरते. मात्र वन्यप्राण्यांसह वाघोबाचा धुमाकूळ असल्यामुळे शेतकरी शेतात जाऊन जागली करण्यास घाबरत आहेत. या दुहेरी संकटामुळे शेतकऱ्यांची पिके डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत आहे. वन विभागाने वाघासह अन्य वन्यप्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
नुकसान भरपाई की खिरापत?
वन्यप्राणी शेतातील पिकांचे नुकसान करीत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होत आहे. नुकसानीबाबत वन विभागाकडे तक्रार केल्यास थातूरमातूर कारवाईचा बडगा उभा केला जातो. परिणामी, भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या हातात केवळ दोन-चार हजार रुपये टिकविल्या जाते. नुकसान लाखाेचे असताना हजाराची भरपाई म्हणजे खिरापत वाटण्याचा प्रकार आहे. त्यातही भरपाईची रक्कम मिळण्यास कधी वर्ष तर कधी दोन वर्ष लागतात.