लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : काेराेना संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने नागपूर शहर पाेलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १५ ते २१ मार्चदरम्यान लाॅकडाऊन जाहीर केले. मात्र, वाडी शहरात काेराेना प्रतिबंधक उपाययाेजना केवळ नावालाच दिसून येत असून, काेराेनाबाधितांचा मुक्तसंचार असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे पाेलिसांची गस्त वाढविण्याची मागणीही केली जात आहे.
लाॅकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून, इतर दुकाने व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे तसेच यात हयगय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाने आधीच दिले आहेत. यात सरकारी व खासगी दवाखाने, गॅस सिलिंडर वितरण सेवा तसेच किराणा, औषधी व भाजीपाल्याच्या दुकानांचा समावेश आहे. परंतु, वाडी शहरात नागरिकांची मनसाेक्त फिरणे, मास्क न वापरणे, गर्दी करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे यासह अन्य बाबी प्रकर्षाने दिसून येत आहेत. या बाबी व नागरिकांचा अनागाेंदी कारभार काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
शहरात बंदी घालण्यात आलेली दुकानेही अधूनमधून उघडी दिसतात. शहरात आढळून आलेल्या काेराेना संक्रमितांना त्यांच्या घरीच विलगीकरण कक्षात राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. शिवाय, प्रशासनाने त्यांच्या घरावर स्टिकर लावण्याशिवाय दुसरी काेणतीही जबाबदारी पार पाडली नाही. ते रुग्ण त्यांच्या घरच्या मंडळींसाेबत विना मास्क वावरत असून, काही रुग्ण बिनधास्त घराबाहेर फिरत आहेत. प्रशासन मात्र या गंभीर प्रकारावरही केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.
...
मास्क नाही तर पेट्राेल नाही
या काळात पेट्राेल व डिझेल विक्रीला मुभा देण्यात आली आहे. वाडी शहर व परिसरातील प्रत्येक पेट्राेल पंपावर ‘मास्क नाही तर पेट्राेल नाही’ असे फलक लावण्यात आले आहे. वास्तवात, पेट्राेल व डिझेल खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांमध्ये बाेटावर माेजण्याएवढ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर मास्क दिसून येत असून, अनेक जण विना मास्क असतात. काही पेट्राेल पंपावरील कर्मचारीदेखील नियमित मास्कचा वापर करीत नाही. त्यामुळे या सूचना फलकाचा उपयाेग काय, असा प्रश्नही सुज्ञ नागरिकांना पडला आहे.