नागपूर : अभ्यासक्रमाव्यतिरीक्त राबविण्यात येणारे उपक्रम, नवभारत कार्यक्रमांतर्गत निरक्षर सर्वेक्षण, विविध अॅपवर ऑनलाईन भरावी लागणारी माहिती, शिक्षण विभागाव्यतिरीक्त इतर विभागाच्या मोहीमांची जनजागृती अशा अशैक्षणिक कामातून शिक्षकांना पुर्णपणे मुक्त करुन फक्त विद्यार्थ्यांना शिकवू द्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ सप्टेंबरला शिक्षक दिनी सामुहिक रजा आंदोलन करणार आहे.
शासन एकीकडे शिक्षकांना सातत्याने अशैक्षणिक कामात गुंतवत आहेत. दुसरीकडे सर्वांना जुनी पेंशन लागू करणे, राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरणे, केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची रिक्त पदे पदोन्नतीने भरणे, सर्व शिक्षकांना निवडश्रेणी लागू करणे, विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी लागू करणे, सातव्या लेतन आयोगाच्या थकबाकी जमा करणे, पगार दरमहा एक तारखेला करण्यात यावा, यासह विविध मागण्या शासन स्तरावर प्रलबित आहेत. या मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे करणार आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी ५ तारखेला एक दिवसाची किरकोळ रजा घेवून सामुहिक रजा आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे, सरचिटणीस निळकंठ लोहकरे यांचेसह अनिल नासरे, विलास काळमेघ, राजु बोकडे,सुरेश श्रीखंडे , सुरेंद्र कोल्हे,अशोक तोंडे, प्रकाश सव्वालाखे, पुष्पा पानसरे, कल्पना इंगळे धर्मेंद्र गिरडकर, उज्वल रोकडे, अनिल श्रीगिरीवार, दिगांबर ठाकरे, रामदास फड, कमलाकर काळे, मीनल देवरणकर, सुरेश भोसकर, शैला भिंगारे, अनिल वाकडे, हेमंत तितरमारे आदींनी केले आहे.