लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या उद्रेकामुळे जगभरात आरोग्यविषयक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र शासनातर्फे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र यामुळे हातावर पोट असलेले गरीब परिवार आणि स्थलांतरित कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा लोकांच्या मदतीसाठी केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग तसेच रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीचे आदेश निर्गमित करून नि:शुल्क भोजन वितरण योजना सुरू केली आहे.गडकरी यांच्या आदेशानुसार खादी ग्रामोद्योग आयोग तसेच लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालया(एमएसएमई)द्वारे ही योजना देशभरात राबविण्यात येत आहे. ३० मार्च ते ३ एप्रिल या कालावधीदरम्यान ही योजना चालविण्यात येत आहे. नागपूर शहरात खादी ग्रामोद्योग आयोग, विभागीय कार्यालयांतर्गत ५०० फूड पॅकेट्सचे नि:शुल्क वितरण करण्यात आले. यामध्ये नागपूर रेल्वे स्टेशन, मनपा निवारा केंद्र सीताबर्डी, गणेश टेकडी मंदिर, गीतांजली टॉकीज चौक, गांधीबाग मार्केट, कळमना मार्केट यार्ड, पीडब्ल्यूएस कॉलेज, कामठी रोड आदी ठिकाणी अन्नाचे वितरण करण्यात आले. याशिवाय गांधीबागस्थित लोहाणा समाज धर्मशाळा येथे आश्रयाला असलेल्या राजस्थान तसेच इतर राज्यातील १५५ कुटुंबातील सदस्यांना फूड पॅकेट्स, चहा आणि लहान मुलांना बिस्कीट व दुधाचे स्वयं फाऊंडेशनतर्फे वितरण करण्यात आले. या उपक्रमात भाजपाचे राज्य प्रवक्ता आमदार गिरीश व्यास यांच्या हस्ते वितरण करून सुरुवात करण्यात आली. यावेळी खादी ग्रामोद्योग मंडळ कार्यालयाचे संचालक डॉ. सी.पी. कापसे यांच्या मार्गदर्शनात केव्हीआयसीचे सहायक संचालक आर.एम. खोडके, जे.के. पवार, व्ही.के. ठाकरे, स्वयं फाऊंडेशनच्या वतीने चारुदत्त बोकारे, अध्यक्ष अनिल चव्हाण, अजित पारसे, राजेश पुरोहित, किशोर दळवी, दीपक हेडाऊ यांचा सहभाग होता. संघर्ष स्वयंसहायता महिला बचत गटाद्वारे हे फूड पॅकेट्स तयार करण्यात आले असून यात कविता लारोकर, कौशल्या माहोरे, भागवंती लारोकर, तृषांत लारोकर, भूषण लारोकर, पारुल लारोकर, अनिकेत डायरे आदींचा सहभाग आहे.