म्हाडा व्यवस्थापनाला बजावली नोटीस : महापौरांनी केली कामगार वसाहतीची आकस्मिक पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गीत मंदिरसमोरील गुजरवाडी परिसरात निमार्णाधीन म्हाडा कॉलनीच्या कामगार वसाहतीतील कोरोनाबाधित कामगारांचा खुलेआम मुक्त संचार सुरू आहे. या सुपर स्प्रेडर्समुळे संक्रमण होऊन इतरांना बाधा होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या संदर्भात माहिती मिळाल्याने येथे महापौर दयाशंकर तिवारी यांनी पथकासह आकस्मिक भेट दिली. त्यातील काही कोरोनाबाधित कामगार स्वगावी गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. यासाठी म्हाडा व्यवस्थापनाला नोटीस बजावण्यात आली असून, तातडीने स्पष्टीकरण मागण्यात आले.
म्हाडा कॉलनीच्या बांधकामावर सुमारे ३०० मजूर कार्यरत आहेत. कोरोनाचे वाढते संक्रमण बघता मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने येथे विशेष चाचणी शिबिर घेण्यात आले होते. यात सहा कामगार पॉझिटिव्ह निघाले आणि सहा जणांना पुन्हा चाचणी करण्यास सांगण्यात आले होते. पॉझिटिव्ह आलेल्याना गृहविलगीकरणाचा सल्ला दिला होता. मात्र हे रुग्ण कामगार वसाहतीत खुलेआम फिरत असल्याची, मास्कचा वापर करीत नसल्याची आणि कॉटन मार्केट, गणेश पेठ, गुजरवाडी या भागात खरेदीसाठी फिरत असल्याची माहिती महापौरांना फोनद्वारे मिळाली. माहिती मिळताच त्यांनी सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, उपद्रव शोध पथक आणि मनपाच्या आरआरटी पथकासह कामगार वसाहत गाठली. तेथील दृश्य धक्कादायक होते. बहुतांश कामगार मास्कविना होते. व्यवस्थापनाचे लोक उपस्थित नव्हते. त्यांना फोनद्वारे माहिती देण्यात आली. मात्र लेबर कॉन्ट्रॅक्टरवर जबाबदारी ढकलत त्याचा फोन क्रमांक देऊन ते मोकळे झाले.
.....
काही पॉझिटिव्ह रुग्ण गावी गेले
लेबर कॉन्ट्रॅक्टरला फोन लावून बोलावण्यास महापौरांनी सांगितले. त्याने १५ मिनिटात पोहोचतो, असे सांगितले आणि फोन बंद करून ठेवला. यानंतर अधिकाऱ्यांनी कामगार वसाहतीचा दौरा केला. मात्र तेथे सहापैकी केवळ दोनच पॉझिटिव्ह रुग्ण वास्तव्यास होते. अन्य कामगारांसोबत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील आपल्या स्वगावी गेल्याची बाब समोर आली. ज्या रेल्वेने त्यांनी प्रवास केला असेल किंवा ज्या गावात ते गेले असतील तेथे सुपर स्प्रेडरचे काम करतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
...
पोलीस कारवाईचे निर्देश
म्हाडा व्यवस्थापनाच्या या हलगर्जीपणाबद्दल महापौरांच्या निर्देशानुसार व्यवस्थापनाला नोटीस बजावून उद्यापर्यंत सविस्तर माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतर दंडात्मक कारवाई करण्याचे आणि पोलीस कारवाई करण्याचेही निर्देश महापौरांनी दिले.