लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या संसर्गाची दाहकता कायम असून, शुक्रवारीदेखील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सात हजारांहून वर गेली. जिल्ह्यात ७ हजार ४८५ नवे बाधित आढळले. हा आतापर्यंतच्या बाधितांचा सर्वांत जास्त आकडा आहे. २४ तासांत साडेसहा हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ८२ रुग्णांचा मृत्यू झाला.
शुक्रवारी जारी झालेल्या अहवालानुसार नागपूर शहरात ४ हजार ८७९ व ग्रामीणमध्ये २,५९८ रुग्ण आढळले. मृतांमध्ये ग्रामीणमधील २०, शहरातील ५४ व जिल्ह्याबाहेरील आठ जणांचा समावेश होता. बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील ४ हजार ८७९ व ग्रामीण भागातील २ हजार ५९८ जणांचा समावेश आहे.
शुक्रवारी एकूण २४ हजार ५३३ चाचण्या झाल्या. यात आरटीपीसीआरच्या १६ हजार ८०४, तर ॲन्टिजनच्या ७ हजार ७२९ चाचण्यांचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये ८ हजार ५४८, तर शहरात १५ हजार ९८५ चाचण्या झाल्या. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ५८ हजार ४१८ कोरोनाबाधित आढळले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ६ हजार ७६७ झाली आहे. यात जिल्ह्याबाहेरील ९९१ रुग्णांचा समावेश आहे.
सुमारे ५७ हजार रुग्ण गृहविलगीकरणात
कोरोना झाल्यानंतर प्रत्येकच रुग्णाला दवाखान्यात भरती होण्याची गरज नसते. नागपूर जिल्ह्यात ५६ हजार ९४६ रुग्ण गृह विलगीकरणात असून, १६ हजार ४०३ रुग्ण विविध सरकारी व खासगी रुग्णालयांत दाखल आहेत.
७३ हजार ॲक्टिव्ह रुग्ण
सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यात ७३ हजार ३४९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यात शहरातील ४४ हजार ४४२ व ग्रामीणमधील २८ हजार ९०७ बाधितांचा समावेश आहे.
सात दिवसांतील आकडेवारी
दिनांक – मृत्यू – नवे बाधित
१७ एप्रिल - ७९ - ६,९५६
१८ एप्रिल - ८५ - ७,१०७
१९ एप्रिल - ११३ - ६,३६३
२० एप्रिल – ९१ – ६,८९०
२१ एप्रिल – ९८ – ७,२२९
२२ एप्रिल – ११० – ७,३४४
२३ एप्रिल – ८२ – ७,४८५