इतरांचा जीव धोक्यात : कंटेन्मेंट झोन क्षेत्रातील नागरिकांकडून नियमांचे उल्लघन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात दररोज ४ ते ५ हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. तर मृत्यूचा आकडा ६५ ते ७५ पर्यंत पोहचला आहे. संक्रमण चेन ब्रेक करण्यासाठी कोविड नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. मनपा प्रशासनाकडूनही यासाठी वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र मृत्यू दारात असूनही कंटेन्मेंट भागातील नारिकांचा शहरात मुक्तसंचार सुरू आहे. अशा सुपर स्प्रेडर्समुळे इतर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
शहरात गृहविलगीकरणात ६० हजारांहून अधिक रुग्ण आहेत. शहराच्या सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात रुग्ण आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक असलेल्या १७५ भागांना हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे. यात दररोज भर पडत आहे. टिन लावून काही वस्त्या सील करण्यात आलेल्या आहेत. परंतु पहिल्या लाटेत हॉटस्पॉट परिसर सील केल्यानंतर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी पोलीस बंदोबस्त नसल्याने नागरिकांचा मुक्तसंचार सुरू आहे. नागरिकांकडून नियम पाळले जात नसल्याने संक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे.
गोदरेज आनंदम हाऊसिंगमध्ये मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने हा परिसर हॉटस्पॉट घोषित करून सील करण्यात आला आहे. परंतु आनंदममधील नागरिकांचा मुक्तसंचार सुरू आहे. क्रिकेटही खेळणे सुरू आहे. यासंदर्भात धंतोली झोनने आनंदमला नोटीस बजावली आहे. शहरातील अन्य हॉटस्पॉट भागातही अशीच परिस्थिती आहे. अशा भागातील नागरिकांनी स्वत: आपण इतरांच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
...
हॉटस्पॉट भागातील नागरिकांची चाचणी व्हावी
कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट भागातील नागरिकांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठवून त्यांची कोरोना चाचणी केली जात होती. यामुळे संक्रमण चेन ब्रेक होण्याला मदत झाली. सतरंजीपुरा, मोमिनपुरा अशा भागातील संक्रमणाला आळा घालणे शक्य झाले. परंतु सध्या अशी सक्षम यंत्रणा कार्यरत नाही. हॉटस्पॉट भागातील रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी होणे आवश्यक आहे. परंतु सध्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबातील नागरिकांची कोरोना चाचणी झाली की नाही, याचीही झोन कार्यालयाकडून विचारणा होत नसल्याचे चित्र आहे.