लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : काेराेना काळात गेली वर्षभर शिक्षकांना अशैक्षणिक कामाला लावले आहे. विशेषत: काेराेना सर्वेक्षणात सहभागी शिक्षकांना प्रशासनाने काेराेनापासून बचावासाठी कुठलेही सुरक्षा साहित्य न देता कामाला लावले. यादरम्यान तालुक्यातील पाच शिक्षकांना काेराेनाशी लढा देताना आपले प्राण गमवावे लागले. ४५ वर्षावरील लसीकरण सर्वेक्षणातील शिक्षकांच्या समस्या व अडचणी लक्षात घेता शिक्षकांना लसीकरण कार्यक्रमातून वगळून कार्यमुक्त करावे, अशी मागणी शिक्षक समन्वय कृती समितीने केली आहे. यासंदर्भात शिक्षकांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील व तहसीलदार बाबाराव तिनघसे यांना निवेदन साेपविले आहे.
सद्यस्थितीत लसीकरण जनजागृती माेहीम सुरू असून, शासनातर्फे लसीकरणासाठी सर्वताेपरी प्रयत्न सुरू आहे. यात सर्वेक्षणात घराेघरी जाऊन जनजागृती व लसीकरण वाढविण्यासाठी नगर पंचायत, नगर परिषद, नगराध्यक्ष, सरपंच, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग, विविध मंडळे, बचतगट, आशावर्कर, ग्रामसेवक आदींना विश्वासात घेऊन जनजागृती करणे अपेक्षित हाेते. परंतु ही जबाबदारी शिक्षकांनाच दिली असून, प्रत्येक शिक्षकाला ५० ते ७५ कुटुंबे नेमून दिली आहेत. उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या १७ ऑगस्ट २०२० राेजीच्या आदेशानुसार निरंतर सर्वेक्षणातून कार्यमुक्ती असतानाही स्थानिक प्रशासनातर्फे शिक्षकांना सर्वेक्षणात लावले जात आहे. यापूर्वीही शासनाच्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत आरोग्य विभागाऐवजी शिक्षकांना ओढून घेण्यात आले होते. विशेष म्हणजे, सर्वेक्षणात सहभागी शिक्षकांना प्रशासनातर्फे कोरोनापासून बचावासाठी लागणारे कुठलेही साहित्य न पुरवता कामाला लावण्यात आले. दरम्यान कुही तालुक्यातील पाच शिक्षकांनी आपले प्राण गमावले आहेत.
सर्वेक्षणादरम्यान नियोजनाचा अभाव, परिसराबाबत योग्य माहिती नसल्याने व अनोळखी व्यक्ती दिसत असलेल्या शिक्षकांना नागरिक दुय्यम वागणूक देऊन दुरूनच हाकलून लावतात. काही ठिकाणी शिवीगाळ झाल्याच्याही घटना शिक्षकांसाेबत घडल्या आहेत. अशावेळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनातर्फे सर्वेक्षणादरम्यान चमू वा समूह करून त्यात स्थानिक अधिकारी, कर्मचारी आणि संरक्षणासाठी पोलीस शिपाई यांचा समावेश असल्यास सर्वेक्षण करणार असल्याचे कृती समितीचे कार्याध्यक्ष विष्णू राणे, अध्यक्ष खेमराज कोंडे यांनी सांगितले. सर्वेक्षणात सहभागी शिक्षकांना नियुक्ती आदेश, त्यांच्या आस्थापनेतून कार्यमुक्ती प्रमाणपत्र व ओळखपत्र, सुरक्षिततेची साधनसामग्री, सुनियोजन करण्याची हमी आणि मृत शिक्षकांना शासनाच्या विमा कवच योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा आदी बाबींकडे लक्ष वेधले. अन्यथा लसीकरण कार्यक्रमातून शिक्षकांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी खेमराज कोंडे, विष्णू राणे, प्रदीप घुमडवार, नरेंद्र पिंपरे, रामकृष्ण ठाकरे, कोहिनूर वाघमारे, शरद देशमुख, सुरेंद्र नारनवरे, देवचंद मानकर आदी शिक्षक उपस्थित होते.