नागपूर : राज्यातील ओबीसी व व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांना प्रशासनिक व सनदी अधिकारी बनण्यासाठी महाज्योतीतर्फे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
एमपीएससीसाठी दोन हजार तर युपीएससीसाठी हजार विद्यार्थ्यांना असे एकंदरीत तीन हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण व सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये ओबीसी व भटक्या जाती-जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग यामधील नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रधारक विद्यार्थी-विद्यार्थीिनी पात्र ठरणार आहेत. २०२२ या वर्षात होणाऱ्या एमपीएससी व युपीएससी परीक्षेसाठी यावर्षी जे पदवी परीक्षा देत आहेत, ते विद्यार्थीसुद्धा पात्र ठरणार आहेत. यासंदर्भात महाज्योतीच्या संकेतस्थळांवर ५ मार्च २०२१ पर्यंत विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून विनामूल्य नोंदणी करावी, असे आवाहन महाज्योती बचाव कृती समितीचे संघटक मिलिंद वानखेडे यांनी केले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना कोरोनाचा संदर्भ लक्षात घेऊन ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे., त्यासाठी आवश्यक टॅब, स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणि इंटरनेट सुविधासुद्धा विनामूल्य देण्यात येणार आहे. कोरोनाचा कालखंड संपला तर राज्यातील नामांकित एमपीएससी व युपीएससी कोचिंग क्लासच्या माध्यमातून बार्टीच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाणार असून, त्या कोचिंग क्लासची फी ही महाज्योती देणार आहे.
- मोफत स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा
महाज्योतीच्या संकेतस्थळावर ५ मार्च २०२१ पर्यंत विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून विनामूल्य नोंदणी करावी. प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करावे.
बबनराव तायवाडे, संचालक, महाज्योती (महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था)