लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरातील दुर्धर आजाराच्या रुग्णांना महापालिकेच्या आपली बस मधून मोफत प्रवासासाठी ‘स्मार्ट कार्ड’ वितरित करण्याचा निर्णय सोमवारी परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे शहरातील दुर्धर आजार असलेल्या गरीब रुग्णांना दिलासा मिळणार आहे.ए.आर.टी.केंद्रात औषधासाठी येणाऱ्या गरजू व गरीब रुग्णांच्या औषधात पैशाअभावी खंड पडू नये या मानवीय दृष्टिकोनातून अशा रुग्णांना महापालिकेच्या रेड बसमधून प्रवासासाठी पास उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी दिली. बैठकीला समितीचे सदस्य प्रवीण भिसीकर, नितीन साठवणे, अर्चना पाठक, अभिरुची राजगिरे, मनीषा धावडे, उज्ज्वला शर्मा, वैशाली रोहणकर, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप उपस्थित होते.शिवाजी जगताप यांनी दुर्धर आजाराच्या रुग्णांना मोफत पास देण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावानुसार सर्व लाभार्थ्यांना मोफत प्रवासासाठी स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्यात येईल. लाभार्थ्यांना त्यांच्या राहत्या घरापासून ए.आर.टी. केंद्राकरिता महिन्यातून सहा वेळा मोफत प्रवास करता येईल. अर्थात ही मुभा नागपूर शहर आणि जिल्ह्यात ज्या हद्दीपर्यंत शहर बस सुरू आहे, तिथपर्यंत राहणार आहे. या पासधारकांना उपलब्ध असलेल्या वेळापत्रकानुसारच बसेसचा वापर करण्याची परवानगी राहील. कुठलीही अतिरिक्त किंवा जादा फेरी सोडणे बंधनकारक राहणार नाही. या स्मार्ट कार्ड अंतर्गत वर्षभरातील १२ महिन्यांत प्रवास करण्याची मुभा राहील. या पासचे दरवर्षी नूतनीकरण करण्यात येणार असल्याचे बंटी कुकडे यांनी सांगितले.
दोन महिन्यात विभागाचा तोटा १.७४ कोटीमहापालिकेच्या २०१८-१९ या वर्षाच्या अर्थसंकल्पात परिवहन विभागासाठी १०० कोटीचा निधी मंजूर आहे. गेल्या मे महिन्यात परिवहन विभागाला महापालिकेकडून ५ कोटी ५९ लाख ७७ हजार ५७२ रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला. तर या महिन्यात विभागाचा खर्च ५ कोटी ९८ लाख ६९ हजार ४१७ रुपये झाला. जून महिन्यात ५ कोटी ६४ लाख २४ हजार ८२५ रुपये उपलब्ध करण्यात आले . तर खर्च ६ कोटी ३२ लाख ७५४ हजार ४६६ रुपये झाला. म्हणजेच दोन महिन्यात विभागाला १ कोटी ७४ लाख ४१ हजार ४८६ रुपये तोटा झाला