आॅनलाईन लोकमतनागपूर : जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात वाघांच्या बछड्यांची वाढती संख्या पाहता वन अधिकारी उत्साहात आहेत. गेले काही दिवस हे अभयारण वाघ ‘जय’मुळे बरेच चर्चेत आले होते. पर्यटकही जयला पाहण्यासाठी गर्दी करायचे. मात्र, जुलै २०१६ पासून जय बेपत्ता झाल्याने पर्यटकही निराश झाले होते. मात्र, आता येथे वाघांचे बछडे मुक्तविहार करताना दिसू लागल्याने पुन्हा एकदा या अभयारण्यात बहार आली आहे.येथील वाघिण टी- व टी-४ चे बछडे पर्यटकांना दिसू लागले आहेत. वाघिण टी-३ चे दोन बछडे गोठणगाव प्रवेश गेटच्या परिसरात आईसोबत फिरताना दिसत आहेत.वन अधिकाऱ्यांनुसार हे बछडे सुमारे आठ महिन्यांचे आहेत. यांचे अत्यंत जवळचे फोटो न मिळाल्याने त्यातील नर व मादी किती आहेत, हे कळू शकले नाही. या चारपैकी एक नर असल्याचा अंदाज लावला जात आहे. जिल्ह्यातील मानद वन्यजीव रक्षक रोहित कारू यांनी सांगितले की,कऱ्हांडला गेट पसिरात एक मोठा वाघ दिसतच आहे. वाघिण ‘चांदणी’ची शारीरिक स्थिती पाहता तिने नुकतेच बछड्यांना जन्म दिल्याचे भासते. मात्र, तिच्यासोबत बछडे दिसून आलेले नाही. पुढील महिन्यापर्यंत ते सोबत दिसू शकतात, असा अंदाज आहे.तीन वर्षीय वाघिण ‘बरखा’ हिनेदेखील बछड्यांना जन्म दिल्याचा अंदाज आहे. काही दिवसांपूर्वी ताडोबा येथील कॉलर वाघिण भ्रमण करीत पवनीपर्यंत पोहोचली होती. तिचे छायाचित्र व पगमार्कवरून ती उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यात असल्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बरखा दिसलीच नाही. त्यामुळे ती परत गेली असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे.बछड्यांची संख्या वाढणे हे चांगले संकेत- उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्य गोठणगाव वन परिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठुंबरे यांनी सांगितले की, अभयारण्यात वाघांच्या बछड्यांची वाढती संख्या ही जंगलासाठी चांगले संकेत आहेत. वाघिण टी-३ च्या बछड्यांचे भ्रमण करतानाचे फोटो वन्यजीवप्रेमी अतुल कुलकर्णी यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. सद्यस्थितीत ताडोबाची कॉलरिंगवाली वाघिणीचे कॅमेरा ट्रॅपमध्ये चित्र व पगमार्गही मिळालेले नाहीत. ती परत गेल्याचा अंदाज आहे.